काँग्रेसच्या असंतुष्टांचा नाना पटोलेंविरुद्ध नाराजीचा सूर? | पुढारी

काँग्रेसच्या असंतुष्टांचा नाना पटोलेंविरुद्ध नाराजीचा सूर?

नागपूर, पुढारी वृत्तसेवा : काँग्रेसच्या असंतुष्टाची नागपुरात डिनर डिप्लोमसी नुकतीच पार पडली. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याविरोधात सर्वच असंतुष्टांनी नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं. काँग्रेसला निधी मिळण्यात होत असलेला दुजाभाव आणि पटोले यांची कार्यपद्धती यावर या असंतृष्टांनी तीव्र नाराजी व्यक्त केल्याचं सूत्रांनी सांगितलं. मात्र, अधिकृतरीत्या या बैठकीसंदर्भात कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

काँग्रेसच्या नाराजांच्या या बैठकीला माजी आमदार आशिष देशमुख, सरचिटणीस संजय दुबे, तानाजी वनवे, अमर काळेंसह अनेक नेत्यांची उपस्थिती होती. अशीही माहिती सुत्रांनी दिली आहे. दिल्लीत नाना समर्थक काँग्रेस मंत्र्यांची तक्रार करत आहेत. तर इकडे काँग्रेस असंतुष्ट नानांवर नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. तर काँग्रेसमधील नाराजांनी अचानक बैठक घेतल्याने त्यावर अनेक तर्कवितर्क लढवले जात असून या नाराजांना नाना पटोले कसे शांत करतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मात्र, पटोले यांच्याकडून या नाराजांच्या बैठकीबाबत अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

काँग्रेसच्या नाराजांची चार दिवसांपूर्वी नागपुरात बैठक पार पडली. हे सर्व नाराज नेते डिनरसाठी एकत्र जमले होते. त्यात काही माजी आमदारांचाही समावेश होता. विशेष म्हणजे या बैठकीला काँग्रेसचे पूर्व विदर्भातील नेते अधिक प्रमाणात उपस्थित होते. या बैठकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची काम करण्याची शैली, रेंगाळलेल्या समित्यांवरील नियुक्त्या, गटबाजी यावर या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. काँग्रेस नाराजांच्या या डिनर पार्टीमध्ये काँग्रेस संघटन बळकटीकरणावरही चर्चा झाली.

हेही वाचलंत का ?  

Back to top button