ED Action : दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन यांनाही 'ईडी'चा दणका, ४.८१ कोटींची मालमत्ता जप्त | पुढारी

ED Action : दिल्लीचे कॅबिनेट मंत्री सत्येंद्र जैन यांनाही 'ईडी'चा दणका, ४.८१ कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईसह राजधानी दिल्लीत अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई करीत शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांच्या संपत्तीवर कारवाई केल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. केंद्रातील भाजप सरकार विरोधातील पक्षांच्या नेत्यांवर एकाच दिवशी ईडीकडून करण्यात आलेल्या कारवाईनंतर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुडबुद्धीने या कारवाया करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. (ED Action)

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे निकटवर्तीय सत्येंद्र जैन यांचे कुटुंबिय तसेच त्यांच्या कंपन्यांची ४.८१ कोटींची मालमत्ता मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने जप्त केली.जैन यांच्याकडे आरोग्य, वीज, गृह, सार्वजनिक बांधकाम,उद्योग, शहरी विकास,जलसंपदा तसेच पाणीपुरवठी या महत्वपूर्ण मंत्रालयाचा कारभार आहे.ईडीने दिलेल्या माहितीनूसार आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यान्वे (पी एमएलए) जैन यांच्या संपत्तीच्या जप्तीकरीता अस्थायी आदेश जारी करण्यात आला आहे. (ED Action)

जैन कुटुंबियांचे अकिंचन डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड, इंडो मेटल इंपेक्स प्रायव्हेट लिमिटेड, प्रयास इंफोसोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेड, मंगलायतन प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड, जे.जे.आयडियल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड जप्त केली आहे. या संपत्ती स्वाती जैन, सुशीला जैन तसेच इंदु जैन यांच्या मालकीच्या आहेत. (ED Action)

२०१५-१६ मध्ये लोकसेवक असताना सत्येंद्र जैन यांच्या मार्फत हवालाच्या माध्यमातून कोलकाता येथील एंट्री ऑपरेटरांना रोख रक्कम ट्रान्सफर करण्याच्या बदल्यात शेल कंपन्यांना ४.८१ कोटी रुपयांची स्थानिक एंट्री प्राप्त झाल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर आली आहे. या रक्कम जमीनीची थेट खरेदी अथवा दिल्ली तसेच आजूबाजूच्या शेतजमीनी खरेदीसाठी घेण्यात आलेल्या कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरण्यात आल्याचा उल्लेख ईडीकडून करण्यात आला आहे. (ED Action)

जैन तसेच इतरांविरोधात उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता जमवल्याप्रकरणी सीबीआय कडून दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यानंतर ईडीकडून कारवाई करण्यात आली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी ईडी सत्येंद्र जैन यांना अटक करेल, असा सूचक इशारा देखील अरविंद केजरीवाल यांनी फेब्रुवारी महिन्यात दिला होता, हे विशेष. (ED Action)

 

 

Back to top button