

डोंबिवली; पुढारी वृत्तसेवा : कल्याण नजीक बापगाव परिसरात मित्रानेच एका अल्पवयीन मित्राचा खून केला आहे.
दीड तोळे सोन्याच्या चेनसाठी हे कृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
या प्रकरणी पडघा पोलिसांनी दोन तरुणांना ताब्यात घेतले आहे. यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.
अधिक माहिती अशी की, कल्याणनजीक बापगाव येथील साईधाम कॉम्पलेक्समध्ये राहणारा सोहम एकनाथ बजागे (वय १४) हा काल संध्याकाळी अचानक बेपत्ता झाला.
सोहमचे नातेवाईक सोहमचा शोध घेत होते. तीन तास शोध घेतल्यावर तो सापडला नाही.
शोध घेत असताना त्याचा मृतदेह त्याच इमारतीच्या तळ मजल्यावर बंद प्लॅटमध्ये आढळून आला.
त्याच्या तोंडावर स्पंज गोठोडे ठेवण्यात आले होते. याची माहिती मिळताच पडघा पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
सोहमचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून पुढील तपास सुरु झाला. पडघा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक दीनेश कटके यांनी सांगितले की, सोहमची हत्या त्याच परिसरात राहणारा अक्षय वाघमारे आणि एका अल्पवयीन मुलाने केली आहे.
दोघे संशयीत आरोपी सोहमचे मित्र होते. सोहमच्या गळ्यात दीड तोळ्याची सोन्याची चेन होती.
त्या दागिन्यावर त्याच्या मित्रांचा डोळा होता. ही सोन्याची चेन घेण्यासाठी सोहमचा खून केल्याचे उघड झाले आहे.
सोहम आई वडिलांचा एकूलता एक मुलगा होता. त्याला दोन बहिणी आहे. या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.