शिक्रापूर पुढारी वृत्तसेवा : पुणे जिल्ह्यातील पाबळ येथे काळी जादू चा प्रकार घडल्याचे उघडकीस आले आहे. पाबळ (ता. शिरूर) येथील स्मशानभूमीत एक काळी पिशवी त्यावर कोहळ्याचा भोपळा, त्यावर पिन टोचून लावलेला मुलीचा फोटो तसेच बाजूला लिंबू, कुंकू व इतर गोष्टी वाहिल्याचा प्रकार समोर आला आहे.
काळी जादू चा हा प्रकार असल्याची शक्यता असून अमावास्येच्या दिवशी हा प्रकार घडल्याची पाबळ गावांत चर्चा आहे. एका आजीच्या दशक्रियेला आलेले नागरिक सुरवातीला हा प्रकार पाहून दचकले. शिक्रापूर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला असून सदर मुलीचा फोटो अस्पष्ट असल्याने ओळख पटू शकली नाही.
पाबळच्या माळवाडी येथील एका आजीच्या दशक्रियेनिमित्त ग्रामस्थ व महिला उपस्थित होते, तर निवृत्त जवान सुनील चौधरी व काही ग्रामस्थ उपस्थित महाराजांचे प्रवचन ऐकत होते. त्याचवेळी त्यांच्या पुढ्यातच दोन फूट अंतरावर वरील काळी जादू भोपळा इत्यादी साहित्य दिसले.
काळी जादू चा हा प्रकार पाहून गोंधळ उडाला. यावेळी अनेकांनी या प्रकारावर भाष्य केले; मात्र मुलीचा फोटो लावून स्मशानात असा प्रकार घडल्याचे दिसून आल्यावर नापसंती व्यक्त करताना भीती व्यक्त केली.
काळी जादू आजच्या विज्ञान युगात अजूनही अंधश्रद्धा पोसल्या जात असल्याचे वास्तव समोर आल्याची प्रतिक्रिया देताना यामागची भूमिका समजणे कठीण असल्याचे सांगून नागरिकांनी काही चुकीचे घडू मये यासाठी दक्ष राहावे तसेच या प्रकाराबाबत काही माहिती मिळाल्यास पोलिसांशी त्वरित संपर्क साधावा अशी सूचना सरपंच मारुती शेळके यांनी नागरिकांना केली.
या प्रकाराची चर्चा परिसरात सुरु आहे. हा प्रकार नेमका कोणी केला याचा तपास पोलिस करत आहेत.