नवी दिल्ली; सुमेध बनसोड : देशात कोरोना महारोगराईची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. पंरतु, कोरोना ची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने देशवासियांच्या लसीकरणाला प्राधान्य देण्यात आले आहे. अशात कोरोना लसीकरण विषयीची चिंताजनक आकडेवारी समोर आली आहे.
सर्वच वयोगटातील केवळ ७ कोटी ८० लाख १० हजार ९८९ नागरिकांचेच लसीकरण आतापर्यंत पूर्ण करण्यात आले आहे. तर, ३१ कोटी ३५ लाख २९ हजार ५०२ नागरिकांना कोरोना विरोधातील लशीचा किमान पहिला डोस लावण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात लसीकरण अभियानाअंतर्गत दररोज सरासरी २९ लाख ७९ हजार ६०६ डोस लावण्यात आले, हे विशेष.
लोकसंख्येच्या तुलनेत लसींचा पुरवठा होत नसल्याने लसीकरण रेंगाळले आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील लसीकरणाचा वेग बराच कमी असल्याचा आरोप त्यामुळे केला जात आहे. देशातील केवळ ५.३% नागरिकांचेच संपुर्ण लसीकरण करण्यात आले आहे.
भारताच्या तुलनेत संयुक्त अरब अमितरात ६५.६%, अमेरिका ४७.५% तसेच कॅनडात ४२.५% नागरिकांचे लसीकरण पुर्ण करण्यात आल्याचा दावा विरोधी पक्षांकडून करण्यात आला आहे.
देशाची लोकसंख्या जवळपास १३६ कोटींच्या घरात आहे. अशात उर्वरित १२८ कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे आव्हान केंद्र तसेच राज्य सरकारांना पेलावे लागणार आहे. १२८ पैकी ३१ कोटी नागरिकांना लसीचा किमान एक डोस लावण्यात आला आहे.
अशात ९६ कोटी ६४ लाख नागरिकांचे लसीकरण वेगाने करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गेल्या आठवड्यातील लसीकरणाच्या सरासरी नुसार उर्वरित देशवासियांचे लसीकरण पूर्ण करण्यासाठी ३२४ दिवसांचा कालावधी लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना आतापर्यंत ४० कोटी ३१ लाख ७४ हजार ३८० लसींच्या डोसचा पुरवठा करण्यात आला. येत्या काळात ८३ लाख ८५ हजार ७९० डोस पुरवण्यात येतील. केंद्राकडून पुरवण्यात आलेल्या एकूण डोस पैकी ३८ कोटी ३९ लाख २ हजार ६१४ डोस वापरण्यात आले. राज्य,केंद्रशासित प्रदेशांकडे अद्याप १ कोटी ९२ लाख ७१ हजार ७६६ डोस शिल्लक आहेत.
दिनांक लसीकरण
१) ५ जुलै ४५,८२,२४६
२) ६ जुलै ३६,०५,९९८
३) ७ जुलै ३३,८१,६७१
४) ८ जुलै ४०,२३,१७३
५) ९ जुलै ३०,५५,८०२
६) १० जुलै ३७,२३,३६७
७) ११ जुलै १२,३५,२८७
एकूण – २,०८,५७,२४४
श्रेणी पहिला डोस दुसरा डोस
१) वैद्यकीय कर्मचारी १,०२,५९,९०२ ७४,६७,८१४
२) फ्रंटलाईन वर्कर्स १,७७,४९,६७० १,०१,०८,७६१
३) १८ ते ४४ वयोगट ११,८०,१७,९७९ ४२,०३,९४७
४) ४५ ते ५९ वयोगट ९,६०,१२,४८६ २,६२,७१,५१०
५) ६० वर्षांहून अधिक ७,१४,८९,४६ २,९७,५८,९५७