

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : कोरोना ची तिसरी लाट देशात डोकं वर काढत आहे. देशातील कोरोना रुग्णसंख्या कमी होत असली तरीदेखील महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांमध्ये रुग्णवाढ सुरूच आहे.
दरम्यान संपूर्ण देशासाठी कोरोना हा अतिशय चिंतेचा विषय आहे. कोरोना संसर्गावर वेळीच उपाय केले नाहीत तर गंभीर परिस्थिती ओढवेल; असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. शुक्रवारी उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते.
देशातील कोरोना संसर्गाचे सर्वाधिक रुग्ण असलेल्या सहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पीएम मोदी यांनी चर्चा केली. महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, ओदिशा आणि तामिळनाडू या राज्यात कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग आहे.
यावेळी पंतप्रधानांनी देशातील कोरोना रुग्णांचे हॉटस्पॉट असलेल्या महाराष्ट्र आणि केरळमधील स्थितीविषयी चिंता व्यक्त केली.
पीएम मोदी म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रारंभ ज्या प्रदेशातून झाला, तेथे अन्य प्रदेशांच्या तुलनेत स्थिती नियंत्रणात राहिल असा तज्ज्ञांचा अंदाज होता.
पंरतु, महाराष्ट्र आणि केरळ या राज्यांमध्ये होणारी कोरोना रुग्णवाढ अतिशय गंभीर असून संपूर्ण देशासाठी तो चिंतेचा विषय आहे.
त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता या दोन राज्यांनी तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करण्याची गरज पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केली.
गेल्या आठवड्यातल्या रुग्णांपैकी ८० टक्के रुग्ण आणि ८४ टक्के मृत्यू हे आजच्या बैठकीला उपस्थित असलेल्या राज्यांमधले आहेत याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले.
पीएम मोदी पुढे म्हणाले, ग्रामीण भागातील आरोग्य क्षेत्राच्या पायाभूत सुविधांमधील कमतरता भरून काढण्यासाठी राज्यांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
सामान्य नागरिकांना सुलभतेने आणि पारदर्शक पद्धतीने स्त्रोत आणि माहिती मिळविता येण्यासाठी आणि रुग्णांना कोणत्याही गडबड गोंधळापासून वाचविण्यासाठी राज्यांनी त्यांच्या माहिती तंत्रज्ञान यंत्रणा, नियंत्रण कक्ष आणि कॉल सेन्टर्स अधिक सशक्त करण्याचा देखील त्यांनी आग्रह धरला.
या बैठकीत हजर असलेल्या राज्यांना वितरीत झालेल्या ३३२ पीएसए ऑक्सिजन संयंत्रापैकी ५३ संयंत्रे कार्यान्वित झाली आहेत असे त्यांनी सांगितले.
या संयंत्रांचे काम वेगाने पूर्ण करावे असे पंतप्रधानांनी उपस्थित मुख्यमंत्र्यांना सांगितले. लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्यापासून वाचविण्याच्या गरजेचा विशेष उल्लेख करत यासंदर्भात शक्य असलेल्या सर्व उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत असेही पंतप्रधान यावेळी म्हणाले.
बैठकीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदीयुराप्पा, ओदिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन उपस्थित होते.
त्याचप्रमाणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, आरोग्य मंत्री मनसुख मांडवियादेखील उपस्थित होते.
https://youtu.be/0r76elg4NLE