ठाणे : रुग्णाच्या नातेवाईकांकडून दिव्यांग वॉर्डबॉयला मारहाण; डॉक्टरांचे काम बंद आंदोलन | पुढारी

ठाणे : रुग्णाच्या नातेवाईकांकडून दिव्यांग वॉर्डबॉयला मारहाण; डॉक्टरांचे काम बंद आंदोलन

ठाणे : पुढारी वृत्तसेवा ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात दिव्यांग वॉर्डबॉयला रुग्णांच्या नातेवाईकांकडून मारहाण झाल्याचा प्रकार घडला आहे. उपचारांसाठी दाखल करण्यात आलेल्या 24 वर्षाच्या मुलाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने संतप्त नातेवाईकांकडून आणि मित्रमंडळी अशा 10 ते 15 लोकांकडून ही मारहाण करण्यात आली आहे. तर रुग्णालयातील ब्रदरला देखील चाकूचा धाक दाखवून धमकवण्यात आले असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

आज (शनिवार) पहाटे हा प्रकार जेव्हा घडला तेव्हा रुग्णालयात पोलीस देखील हजर नव्हते. डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर वारंवार होणाऱ्या या हल्ल्यांमुळे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी सकाळी काम बंद आंदोलन पुकारले होते. मात्र जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.कैलास पवार यांनी समजूत काढल्यानंतर तसेच संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर हे काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले.

शनिवारी माध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास एक (24 वर्षीय) मुलाला छातीत दुखत असल्याने सिव्हिल रुग्णालयात नातेवाईक आणि मित्रमंडळींनी दाखल केले. मृत झालेला तरुण वागळे इस्टेट परिसरात राहणारा आहे. सुरुवातीला जनरल वॉर्डमध्ये दाखल केल्यानंतर प्रकृती आणखी बिघडल्याने त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. मात्र उपचारा दरम्यान पहाटे 4 वाजण्याच्या दरम्यान रुग्णाच्या मृत्यू झाला. मात्र रुग्ण मृत झाल्याचे समजताच संबंधित नातेवाईक आणि त्याच्या मित्रमंडळींनी दिव्यांग असलेल्या राहुल गायकवाड या वॉर्डबॉयला मारहाण केली. तर किरण पारधे या ब्रदरला चाकू लावून धमकवण्यात आले. जेव्हा हा प्रकार घडला तेव्हा रुग्णायात पोलीस देखील उपस्थित नसल्याने कर्मचारी प्रचंड दहशतीखाली होते.

पहाटे हा प्रकार घडल्यानंतर अशाप्रकारे वारंवार हल्ले होत असल्याने रुग्णालयातील डॉक्‍टर्स आणि कर्मचाऱ्यांनी या हल्ल्याचा निषेध करत रुग्णालयात काम बंद आंदोलन केले. मात्र रुग्णांचे हाल होऊ नये यासाठी डॉक्‍टर्स आणि कर्मचाऱ्यांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले आहे.

सर्व संशयीत आरोपी फरार, सीसीटीव्ही आधारे आरोपींचा शोध सुरू

रुग्णांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी अशा 10 ते 15 लोकांनी हा हल्ला केला असून, हे सर्च संशयीत आरोपी फरार आहेत. मात्र सीसीटीव्ही मध्ये हा सर्व प्रकार कैद झाला असल्याने आता सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे या सर्वांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे, तर संबंधित रुग्णाचे शव अजूनही शवगृहातच ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा : 

Back to top button