कदाचित बहिणीचे प्रेम कमी पडले असेल : खा. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला | पुढारी

कदाचित बहिणीचे प्रेम कमी पडले असेल : खा. सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना टोला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मी पहिला देश, मग राज्य, मग पक्ष आणि मग नाती पाहते. मी नात्यांसाठी राजकारणात आले नाही. मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आली आहे. दादा असे बोलतात याचे मला आश्चर्य वाटते. कदाचित बहिणीचे प्रेम कमी पडले असेल. दुर्दैव आहे की सगळेच नात्यांमध्ये अडकले आहेत, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांना खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला.
पुण्यात शुक्रवारी सुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. बायको म्हणाली, अहो हे काम करून द्या तर करावेच लागणार. नाहीतर
माझे काही खरे नाही, या अजित पवार यांच्या विधानावर विचारलेल्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली.

सुळे म्हणाल्या, उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे राज्य कणखर नेता आणि विरोधी पक्षनेता म्हणून पाहत होते. परंतु आता जे अजित पवार दिसत आहेत ते अजित पवार नाहीत. आताच्या अजित पवारांचे भाषणे ऐकले की आश्चर्य वाटते. आमच्याशी घटस्फोट होऊन सात महिने झाले. अठरा वर्ष एका संघटनेत आम्ही काम केले आहे. महायुतीच्या सगळ्या नेत्यांना मिळून पवारसाहेबांना संपवायचे आहे. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी बारामतीत येऊन बोलून दाखवले होते. हे सगळे पवारसाहेबांना संपवण्यासाठी षड्यंत्र सुरू आहे. महायुतीकडून जी कृती केली जात आहे. त्याने शरद पवारांना त्रास द्यायचा आहे, हे सिद्ध होत आहे.

सर्वाधिक प्रश्न महापालिकेचे

मतदानाच्या वेळी खडकवासला भागात भाजपचे महापालिकेतील अपयश दिसून येईल. पुण्यात सर्वाधिक प्रश्न हे महापालिकेचे आहेत. पुण्यात भाजपची सत्ता असताना मागील पाच वर्षांत पाणी, वाहतूक आणि कचर्‍याची समस्या वाढली आहे. महानगरपालिका, विधानसभा आणि लोकसभा या सर्वांची जबाबदारी आमच्यावर द्या. आम्ही सर्व प्रश्न सोडवू, असेही सुळे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा

Back to top button