Thane news : शहापुरात २३ गावपाड्यात स्मशानभूमीच नाही | पुढारी

Thane news : शहापुरात २३ गावपाड्यात स्मशानभूमीच नाही

दिनेश कांबळे

डोळखांब :  शहापुर तालुका हा शासन दरबारी दुर्गम व डोंगराळ तालुका म्हणून गणला गेला आहे. आजही तालुक्यातील २३ गावपाड्यात प्रशासनाच्या उदासीनतेमुळे स्मशानभुमीच नसल्याने याठिकाणी गावात मयत झालेच तर नदीकाठी उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने मृत्युनंतरही मरण यातना सहन कराव्या लागत असल्याचे भयाण वास्तव समोर आले आहे.
शहापुर तालुक्यात ११० ग्रामपंचायतीचा समावेश होतो. याठिकाणी २२७ महसुल गावे मिळून एकुण ३६७ गावपाडे आहेत. तर अंदाजे तिन लाख ३४ हजार लोकसंख्या आहे. या २२७ गावांपैकी २३ गावात स्मशानभूमीची सुविधाच नसल्याने वृध्दापकाळाने किंवा आजारपणामुळे अथवा इतर काही कारणाने कुणाचा मृत्यु झाला तर अशावेळी पावसाळ्यात देखील नदीकाठी उघड्यावरच मयतावर अंत्यसंस्कार करावे लागत असल्याने कठिन बडा यमघाट, असे म्हणण्याची वेळ आली आहे.

याबाबत अधिक चौकशी केली असता ३६७ पैकी बहुतांशी गावपाड्यात विविध कारणांमुळे स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध नसल्याची माहिती मिळाली आहे. काही ठिकाणी खाजगी मालक जागा देण्यासाठी तयार नाहीत. तर बऱ्याच ठिकाणी वनविभागाच्या जागेची अडचण निर्माण होत आहे. यासाठी ग्रामपंचायत स्तरावर वनविभाला विश्वासात घेवुन तिन दोनचे प्रस्तावाला मंजुरी घेणे गरजेचे आहे. तालुक्यातील आपटे, दहिवली, निभळपाडा तसेच साखरपाडा याठिकाणी स्मशानभूमीची व्यवस्था नसुन शहापुर नगरपंचायतीला लागुनच असलेल्या तसेच चार हजार लोकसंख्या असणाऱ्या गोठेघरसाठी देखील जागेअभावी स्मशानभूमी नसल्याने जवळच असलेल्या गंगा देवस्थान याठिकाणी अंत्यसंस्कार करावे लागतात.

तसेच तालुक्यातील परटोली गावासाठी स्मशानभूमी करीता दोनवेळा मंजुरी मिळूनही केवळ जागा उपलब्ध नसल्याने काम करता येत नाही. तर मोहीली माळीपाडा याठिकाणी मयताला भातसा धरणाचे मुंबईला पाणीपुरवठा करणारे पाईप लाईनवरून जिवघेणा प्रवास करून नदीकाठी उघड्यावरच अंत्यसंस्कार करावे लागतात. याठिकाणी वनविभागाने जागेची पहाणी करून प्रस्ताव वरिष्ठांना सादर केले आहेत. परंत विशेष म्हणजे तालुक्यात बऱ्याच ठिकाणी जागा नसतांना व स्मशानभूमी मंजूर असतांना देखील काम नकरता च निधीचा अपहार झाल्याचे यापूर्वी समोर आले आहे. यासाठी निधीचा दुरूपयोग करणाऱ्या ग्रामसेवकांवर निलंबनाची कारवाई झाली आहे. याहीपेक्षा महत्वाचे म्हणजे यावर्षी निधी उपलब्ध असतांना सुद्धा शहापुर पंचायत समिती कडुन जाणारे निधिचे प्रस्तावच तयार करण्यात आले नसल्याची देखील चर्चा आहे.

शहापुर तालुक्यातील २३ गावात स्मशानभूमी नाही हे खरे आहे. परंतु यासाठी निधिची अडचण नाही. स्थानिक पातळीवर जागा उपलब्ध नाही. जागेसाठी ग्रामपंचायतमार्फत प्रयत्न सुरू आहेत. -भास्कर रेंगडे, गटविकास अधिकारी, पं.स. शहापुर

शहापुर तालुक्यात ज्या गावांना स्मशानभूमी नाही, अशाठिकाणी लवकरात लवकर काम मंजुर करून निधी उपलब्ध करावा. जागेचा प्रश्न सोडवावा. – प्रकाश खोडका, तालुका सचिव, श्रमजीवी संघटना

Back to top button