तुळजापूर : घाबरल्यानेच महाराष्ट्रात मोदी, शहांच्या सभांचा धडाका; शरद पवार यांचे टीकास्त्र | पुढारी

तुळजापूर : घाबरल्यानेच महाराष्ट्रात मोदी, शहांच्या सभांचा धडाका; शरद पवार यांचे टीकास्त्र

तुळजापूर – पुढारी वृत्तसेवा : राज्यातील मतदारांचा अंदाज आल्यानेच पराभव स्पष्ट दिसू लागला आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री यांच्या सभांचा धडाका राज्यात सुरु झाला आहे. मात्र काहीही झाले तरी राज्यात महाविकास आघाडीसाठी वातावरण अनुकूल असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले. जुन्या बसस्थानकाच्या रस्त्यावर बुधवारी रात्री झालेल्या या जाहीर सभेत ते बोलत होते.

व्यासपीठावर खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आ. कैलास पाटील, माजी आ. राहुल मोटे, अशोक जगदाळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय दुधगावकर, आम आदमी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अजित पाटील, मुकुंद डोंगरे, शामलताई वडणे, प्रतापसिंह पाटील, रामचंद्र आलुरे, जीवनराव गोरे, डॉ. स्मिता शहापूरकर, कमलाकर घोडके, राजा शेरखाने, शफी शेख, ऋषिकेश मगर, अमोल कुतवळ यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

खा. पवार म्हणाले की, देशामध्ये महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याची झळ सामान्य माणसाला बसली आहे. २०१४ मध्ये पेट्रोलचा दर ७१ रुपये होता, तो आज १०६ रुपये आहे. बेरोजगारी खूप मोठ्या संख्येने वाढली असून ८४ टक्के बेरोजगार भारतामध्ये दिसून येत आहेत, असा अहवाल एका अभ्यास यंत्रणेने दिला आहे, असे देखील सांगून मोदी सरकारचा कारभार देशावर संकट आणणारा आहे. त्यामुळे सत्तेचा गैरवापर करणाऱ्या या सरकारला दूर करा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.

तुम्ही १० वर्षांचा हिशेब द्या

मागील दहा वर्षे देशात सत्तेवर असलेले मोदी, शहा राज्यात आले की, उद्धव ठाकरे आणि माझ्यावर टीका करुन आजपर्यंत काय केले, याचा हिशेब मागत आहेत. वास्तविक तुम्ही दहा वर्षांचा हिशेब देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खा. पवार यांनी केले.

Back to top button