चला, गड्डा यात्रेस अधिक व्यापक करूयात… | पुढारी

चला, गड्डा यात्रेस अधिक व्यापक करूयात...

सोलापूर : संजय पाठक

पर्यटनाचा, निसर्गाचा कोणताही वारसा नसलेल्या सोलापूरला लाभलेला गड्डा यात्रेचा सांस्कृतिक ठेवा आपण विशिष्ट भाषिक, विशिष्ट समाज, मानकऱ्यांचे नेहमीचे विशेषतः यात्रेच्या तोंडावर उफाळून येणारे वाद यातून मोकळा करत तो सर्वसमावेशक, व्यापक करायला हवा. तरच सोलापूरचे हे सांस्कृतिक भूषण अधिकाधिक व्यापक होईल. तसेच विशिष्ट समाजाची यात्रा असा गड्डा यात्रेस चिकटलेला हेटाळणी दर्शक शब्द जोपर्यंत गळून पडणार नाही, किंवा तो जाणीवपूर्वक नष्ट केला जात नाही. तोवर यात्रा अधिक व्यापक होणार नाही हेही तितकेच खरे.

सुमारे साडेनऊशे वर्षांचा वारसा लाभलेली श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा उत्साहात सोलापुरात सुरू आहे. जानेवारी महिन्यात दुसऱ्या सप्ताहात संक्राती दरम्यान होणारी ही यात्रा एकमेवाव्दितीय आहे. शुभ्र पोषाखातील यात्रेकरू, गगनाशी स्पर्धा करणारे नंदीध्वज, सर्व जाती, धर्म, पंथांच्या भाविकांचा समावेश, मुस्लिम बांधवांचीही असलेली सेवा अशा सर्वच अंगाने ही यात्रा अन्य यात्रा-जत्रांपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी ठरते.

या यात्रेमागची अख्यायिका खूप उत्कंठावर्धक आहे. बाल शिवयोगी सिद्धरामेश्वराला ईश्वर (मल्लिकार्जून) भेटल्याची कथा चरित्रात वर्णिली आहे. जिथे भेट झाली ते ठिकाण ‘गुरूभेट’ हे ठिकाण सध्याच्या जिल्हा परिषदेजवळच काँग्रेस भवनच्या समोरच आहे. बाल शिवयोगी सिद्धरामेश्वर एकवेळ भेटून अदृश्य झालेल्या श्री मल्लिकार्जुनाला भेटण्यास पायी श्रीशैलला गेले. तिथे पार्थिव लिंग पाहून समाधान न झाल्याने तिथे असणाऱ्या रूद्र कड्यावरून बाल शिवयोगी सिद्धरामेश्वराने स्वत:ला झोकून दिले; त्यावेळी श्री मल्लिकार्जुनाने पुन्हा दर्शन देऊन हृदयी घेतल्याची कथा आहे. तेव्हा बाल शिवयोगी सिद्धरामेश्वरांनी श्रीशैलात राहण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर श्री मल्लिकार्जूनाने बाल शिवयोगी सिद्धरामेश्वरास सोन्नलगीस परतण्याची आज्ञा केली. ‘मी सोन्नलगीस जाईन, तिथे वास करीन,’ असे मल्लिकार्जुनाने सांगितल्यानंतर बाल शिवयोगी सिध्दरामेश्वर परतला. त्याने सोन्नलगीत (सोलापुरात) श्री मल्लिकार्जुन मंदिर स्थापन केले. आजही सोलापुरातील भुईकोट किल्ल्यात आणि उत्तर कसब्यात अशी दोन मल्लिकार्जुन मंदिरे आहेत.

सिद्धरामेश्वराच्या आश्रमात सेवा करायला येणारी कुंभारकन्या कुमारव्वा (गंगव्वा असाही उल्लेख जुन्या कागदपत्रांमध्ये मिळतो) हिने सिद्धरामेश्वरांशी विवाह करण्याची इच्छा व्यक्त केली. ‘मी स्वत: त्या मल्लिकार्जुनाला वरले आहे. त्यामुळे मी स्वत: त्याची सतीत्व भावाने पूजा करीत असतो. तुला विवाह करावयाचा असल्यास योगदंडाशी विवाह कर,’ असे सिद्धरामेश्वर तिला सांगतात. त्याची स्मृती म्हणून मकरसंक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजे भोगीला श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील सम्मती कट्ट्यावर विवाह सोहळा आयोजित केला जातो. आजही महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेशातून लाखो भाविक या सोहळ्यात सहभागी होतात. उत्तर कसब्यातील कुंभारवाडा आजही प्रसिद्ध आहे.

नंदीध्वजांची मिरवणूक कसब्यातील हिरेहब्बू वाड्यातून निघते. यण्णीमज्जन, अक्षता सोहळा, होम, भाकणूक, शोभेचे दारूकाम आणि कप्पडकळ्ळी असे विधी या यात्राकाळात उत्साहात पार पडतात. या सर्व यात्रा काळात शुभ्र बाराबंदीतील यात्रेकरू लक्षवेधी ठरतात. जणू सोलापूरच्या रस्त्यावर दूधसागरच वाहू लागला असे वाटावे असे ते चित्र असते. कोणताही गोंधळ, गडबड नाही, खूप गर्दी असूनही पाळली जाणारी शिस्त, पारंपारिक रिवाज म्हणजे मशाल, हिरवा – लाल झेंडा, बैलगाडी, ताशा, सनई या वाद्यांसह ही अतिशय वैभवी लवाजम्यासह निघणारी यात्रा देशविदेशात कुतूहलाचा विषय आहे.

ही यात्रा खूप प्राचीन आहे. तरीही ही यात्रा सोलापूरकरांचीच राहिली आहे. काही विशिष्ट लोकांचीच मानली जाते. बोलली जाते. आता इतक्या वर्षानंतर का असेना ही यात्रा कुणा एका समाजाची नसून ती समस्त मानवतेची, शहर जिल्ह्यासह राज्य-देशाची व्हावी यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची वेळ आली आहे. अऩ्य भाषिकांना आपलेसे करत ही यात्रा व्यापक करण्याचा प्रयत्न होण्याची ही वेळ आहे. यात्रेच्या मानकरी व राजकारण्यांव्यतिरिक्त अन्य क्षेत्रातील लोकांना या यात्रेत मानाचे पान दिले पाहिजे. त्यांना या यात्रेत समाविष्ट करत यात्रेचा पाया अधिक व्यापक केला पाहिजे.

पर्यटनाचा, निसर्गाचा कोणताही वारसा नसलेल्या सोलापूरला लाभलेला गड्डा यात्रेचा सांस्कृतिक ठेवा आपण विशिष्ट भाषिक, विशिष्ट समाज, मानकऱ्यांचे नेहमीचे विशेषतः यात्रेच्या तोंडावर उफाळून येणारे वाद यातून मोकळा करत तो सर्वसमावेशक, व्यापक करायला हवा. तरच सोलापूरचे हे सांस्कृतिक भूषण अधिकाधिक व्यापक होईल. तसेच विशिष्ट समाजाची यात्रा असा गड्डा यात्रेस चिकटलेला हेटाळणी दर्शक शब्द जोपर्यंत गळून पडणार नाही, किंवा तो जाणीवपूर्वक नष्ट केला जात नाही तोवर यात्रा अधिक व्यापक होणार नाही हेही तितकेच खरे.

Back to top button