प्रज्वलचा कारनामा, साधनशूचितेचा पंचनामा | पुढारी

प्रज्वलचा कारनामा, साधनशूचितेचा पंचनामा

गोपाळ गावडा

आजोबांनी पक्ष काढला, काका-बाबांनी वाढवला म्हणजे आता कार्यकर्त्यांवर माझाच हक्क! ही सरंजामशाही मानसिकता अजूनही आपल्या राजकारण्यांमध्ये कायम आहे. शिवाय प्रत्येक मुद्द्याचा राजकीय वापर कसा करता येईल, यामध्येच नेते मश्गुल आहेत. त्यामुळेच प्रेमप्रकरणातून झालेल्या हत्येला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होतो आणि शेकडो महिलांचे लैंगिक शोषण कधी पडद्याआड ठेवले जाते, कधी त्याकडे दुर्लक्ष केले जाते, तर ते कधी उजेडात येते.

कर्नाटकाचे तत्कालीन सहकार मंत्री लक्ष्मण सवदी विधानसभेत अधिवेशन सुरू असतानाच आपल्या मोबाईलवर पोर्न द़ृश्ये बघत बसले होते. ते उघडकीस आल्यानंंतर नेत्यांचे चारित्र्य हा सार्वजनिक जीवनात चर्चेचा विषय झाला होता. तो विषय हवेत विरतो न विरतो, तोच काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले कर्नाटकातील ताकदवान नेते रमेश जारकीहोळी यांची अश्लील सीडी प्रकाशात आली आणि नेत्यांच्या चारित्र्याबद्दल लोक थेट बोलू लागले.

संबंधित बातम्या

गेल्या पाच वर्षांतील या दोन प्रकरणांनी राजकारणात बर्‍यापैकी उलथापालथ केली असताना, आता तिसरे प्रकरण बाहेर आले आहे ते माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडांच्या नातवाचे. सत्ता हातात असली की, ती पिळवणुकीसाठीच वापरायची, ही बहुंताशी नेत्यांची मानसिकता या तिन्ही प्रकरणांतून समोर येते. त्यातही देवेगौडांचा खासदार असलेला नातू जेव्हा अश्लील चित्रण स्वतःच करतो आणि त्याचा वापर करून महिलांची पिळवणूक करतो, हे स्पष्टपणे बाहेर येत असताना राजकारण आणखी किती तळाला जाणार, हा प्रश्न उभा राहतो.

काय आहे प्रकरण?

प्रज्वल रेवण्णा हा देवेगौडांचा नातू. तो हासन मतदारसंघातून निधर्मी जनता दलाचा खासदार आहे. त्याने आपल्या घरात मोलकरीण म्हणून काम करणार्‍या महिलेचे आणि तिच्या मुलीचे लैंगिक शोषण करून, त्याचे व्हिडीओ बनवल्याचा आरोप आहे. प्रज्वलचे वडील म्हणजेच देवेगौडांचे पुत्र रेवण्णा यांच्यावरही हाच आरोप झाला आहे. रेवण्णा हेही आमदार आहेत. लैंगिक शोषणाचा प्रकार 2017 पासूनच सुरू आहे, असे पोलिस तक्रार सांगते. शिवाय मोलकरणीसह काही नेते आणि अधिकार्‍यांच्या पत्नी, पक्षाच्या कार्यकर्त्या यांचेही असेच व्हिडीओ बनवल्याचा आरोप प्रज्वलवर आहे. असे सुमारे साडेतीन हजार व्हिडीओ प्रज्वलच्या आयफोनमध्ये असण्याचा अंदाज आहे. कळस म्हणजे प्रज्वलचा हा प्रकार त्याच्या आईला माहीत होता, असे तक्रारीत नमूद आहे.

रेवण्णांच्या घरातील मोलकरीण ही रेवण्णांच्या पत्नीची म्हणजे प्रज्वलच्या आईच्या ओळखीचीच महिला. ओळखीची होती म्हणून तिला मोलकरीण म्हणून ठेवून घेण्यात आले. मात्र, जेव्हा जेव्हा प्रज्वलची पत्नी बाहेरगावी असायची, तेव्हा तेव्हा प्रज्वल मोलकरीण आणि तिच्या मुलीचे लैंगिक शोषण करायचा. असा प्रकार पहिल्यांदा घडला, तेव्हाच त्या मोलकरणीने प्रज्वलच्या आईला स्पष्टपणे कल्पना दिली होती. पण फरक काहीच पडला नाही. उलट तसले प्रकार वाढले. त्यामुळे मोलकरणीने काम सोडणे पसंत केले. तरीही प्रज्वल त्यांना व्हिडीओ कॉल करायचा, असे तक्रार सांगते.

पक्ष कार्यकर्त्यांचेही शोषण

मोलकरीण घर सोडून गेल्यानंतर प्रज्वलची नजर आपल्या पक्षातील म्हणजे निधर्मी जनता दलाच्या दुसर्‍या फळीतील नेत्यांच्या पत्नींवर पडली. शिवाय पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांचेही त्याने असेच व्हिडीओ बनवले असल्याचे तपासातून पुढे येत आहे. म्हणजेच मोलकरणीने प्रज्वलच्या आईला सांगितल्यानंतरही हे प्रकार वाढत गेले आणि शेकडो महिला प्रज्वलच्या शिकार बनल्या. 2017 पासून म्हणजे गेली सात वर्षे हा प्रकार सुरू होता; पण उजेडात आला तो आताच.

आठ महिन्यांपूर्वी कुणकुण

प्रज्वल बाईलवेडा आहे, असे बंगळूरच्या राजकीय वर्तुळाचे मानणे आहे. तो महिलांचे लैंगिक शोषण करतो आणि त्यांचे चित्रणही करतो, असे निजद नेते खासगीत बोलायचे. म्हणजे त्याच्या या कृत्यांची माहिती त्याच्या पक्षातील नेत्यांना होतीच; पण गेल्या जूनमध्ये ती भाजप आणि काँग्रेस नेत्यांपर्यंतही पोचली होती. कदाचित त्याचवेळी या प्रकरणाचा विस्फोट झाला असता. मात्र, प्रज्वलने न्यायालयात धाव घेऊन तीन बडे नेते आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध आणले. त्यानंतर प्रज्वलच्या सेक्स व्हिडीओबद्दल बातम्या दाखवू अथवा छापू नयेत, असा न्यायालयाने दिला होता. ‘अश्लील व्हिडीओंमध्ये मी नाही, तर दुसर्‍याच्या चेहर्‍यावर माझा चेहरा लावून बदनामीचा कट आखण्यात आला आहे,’ असा युक्तिवाद प्रज्वलने गेल्या जूनमध्ये केला होता. पण आता एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे सारे व्हिडीओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाल्यानंतर प्रज्वलचे तसे वक्तव्य आलेले नाही. सत्य बाहेर येईल, इतकेच त्याने म्हटले आहे.

प्रज्वच्या अश्लील व्हिडीओंबद्दलची चर्चा राष्ट्रस्तरावर पोचण्याची दोन कारणे. पहिले म्हणजे तो माजी पंतप्रधान देवेगौडांचा नातू. दुसरे म्हणजे देवेगौडांच्या पक्षाशी भाजपने लोकसभेसाठी केलेली युती. दक्षिण भारतात भाजपला सर्वाधिक जवळचे कोण वाटत असेल, तर ते कर्नाटक आणि युतीसाठी कोण योग्य वाटत असेल, तर तो देवेगौडांचा पक्ष. देवेगौडांच्या निधर्मी जनता दलाच्या युतीतूनच भाजप 2004 मध्ये पहिल्यांदा कर्नाटकात सत्तेतील भागीदार झाला होता. दक्षिणी राज्यात सत्तेत असण्याची भाजपची ती पहिली वेळ. अर्थात, युती तीन वर्षांत तुटली. पुढे दोन्ही पक्षांतील दरी इतकी वाढली की, 2014 च्या लोकसभा निवडणुकीआधी देवेगौडांनी म्हटले होते की, ‘नरेंद्र मोदी जर देशाचे पंतप्रधान झाले, तर मी आत्महत्या करेन.’ मोदी देशाचे पंतप्रधान झाले. दोनदा झाले.

काँग्रेसकडून वापर

प्रज्वलच्या अश्लील व्हिडीओंची सीडी खरे तर एप्रिल महिन्याच्या मध्यावर चर्चेत आली. मात्र, काँग्रेसने त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असण्याची शक्यता आहे. कर्नाटकात पहिल्या टप्प्यात मतदान झाले 26 एप्रिलला. पण 15 एप्रिलपालूनच प्रज्वलच्या व्हिडीओंची चर्चा कुठे ना कुठे होती; पण काँग्रेस गप्प राहिली. त्यामागे वक्वलिग समाजाला न दुखावणे हे कारण मानले जाते. वक्वलिग हा दक्षिण कर्नाटकात स्थिरावलेला समाज. हासन, म्हैसूर, मंड्या अशा काही जिल्ह्यांत या समाजाचे प्राबल्य. देवेगौडा त्याच समाजाचे. प्रज्वल प्रकरण बाहेर करून वक्वलिग समाजाला लोकसभा मतदानाच्या आधी दुखावण्याचा धोका नको, अशी खलबते काँग्रेसमध्ये चालली होती, असे मानले जाते. त्यामुळेच 26 एप्रिलचे मतदान संपले आणि दुसर्‍या-तिसर्‍या दिवशी प्रज्वल-रेवण्णा यांच्याविरुद्ध पोलिस तक्रार नोंद झाली. आता प्रियांका गांधींसह सारे काँग्रेस नेते भाजपच्या नेत्यांना जाब विचारताहेत की, अशा पक्षाशी तुमची युती कशी? तर भाजप नेते काँग्रेसला विचारत आहे की, पंधरवड्यापासून प्रकरण माहीत असताना तुम्ही कारवाई का केली नाही?

आमची युती निजदशी आहे, नेत्यांशी नाही असा युक्तिवाद भाजप आता प्रज्वल प्रकरणानंतर करत आहे. पण निजदशी युतीच नको, असे स्थानिक भाजप नेत्यांनी श्रेष्ठींना गेल्या डिसेंबरमध्येच कळवले होते. देवराजे गौडा या भाजप नेत्याने गृहमंत्री अमित शहांना पत्र पाठवून, प्रज्वलचा इतिहास कथन करत काँग्रेस हे प्रकरण लोकसभेचा मुद्दा बनवणार, अशी पूर्वसूचना दिली होती. ते पत्रही आता व्हायरल होत आहे. तरीही पुढे युती झाली. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी विरोध करूनही झाली. आता त्याचे परिणामही भोगावेच लागतील.

प्रज्वल प्रकरणातून दोन गोष्टी पुन्हा प्रकर्षाने समोर येतात. पहिली म्हणजे सत्ता आली की तिचा दुरुपयोग ठरलेला. पॉवर करप्टस्. आजोबांनी पक्ष काढला, काका (माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी) आणि बाबांनी वाढवला म्हणजे आता कार्यकर्त्यांवर माझाच हक्क! ही सरंजामशाही मानसिकता अजूनही आपल्या राजकारण्यांमध्ये कायम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे प्रत्येक मुद्द्याचा राजकीय वापर कसा करता येईल, यामध्येच नेत्यांचे मश्गुल असणे. म्हणून काँग्रेस इतके गंभीर प्रकरण चालढकल करत पुढे नेते आणि साधनशूचितेची उठता-बसता शपथ खाणारा भाजप त्याआधी अशा मानसिकतेशी हातमिळवणी करतो.

Back to top button