धुळे : कापसाची चोरी करणाऱ्या टोळीला तडीपारीचे पोलीस अधीक्षकांचे आदेश | पुढारी

धुळे : कापसाची चोरी करणाऱ्या टोळीला तडीपारीचे पोलीस अधीक्षकांचे आदेश

धुळे : पुढारी वृत्तसेवा
साक्री तालुक्यात शेतकऱ्यांचा कापूस चोरी करणारी तसेच आर्थिक नुकसान करणाऱ्या पाच जणांच्या टोळीला दोन वर्षासाठी धुळे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी दिली आहे.

साक्री तालुक्यासह धुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या शेतातील शेडमध्ये ठेवलेल्या कापसाची मोठ्या प्रमाणे चोरी सुरू होती. त्याचप्रमाणे शेतातील अन्य वस्तूंच्या चोरीचे प्रमाण देखील वाढले होते. त्यामुळे चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात आले. यात साक्री तालुक्यातील प्रमोद सुखदेव शिवदे (रा. कावठे), दिलीप किशोर भिल (रा. कोकले) तसेच सुरेश रामलाल माळीच (रा. कोकले), जगदीश राजू मालचे (रा. कावठे), तसेच सुनील बापू मरसाळे (रा. कावठे) यांच्यावर अनेक वेळेस कारवाई करण्यात आली. या टोळीतील सदस्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन शेतकऱ्यांच्या शेताच्या शेडमध्ये ठेवलेल्या शेतमालाची चोरी केल्याचे तपासात उघड झाले. या सर्वांच्या विरोधात साक्री पोलीस ठाण्यात २०२१ पासून चोरीचे सहा गुन्हे दाखल करण्यात आले होते. टोळक्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी पाहता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, साक्री विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांनी धुळे जिल्ह्यात या चोरट्यांनी पुन्हा अशा प्रकारे चोरीचे गुन्हे करू नयेत. सर्वसामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना उपद्रव होऊ नये, यासाठी त्यांच्यावर कारवाई करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे ,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी तसेच साक्री पोलीस ठाण्याचे हर्षवर्धन गवळी, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे हेड कॉन्स्टेबल संतोष हिरे तसेच हर्षल चौधरी यांनी या संदर्भातील कार्यवाही केली. अखेर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या टोळक्याला दोन वर्षासाठी धुळे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. या टोळीने पोलीस अधीक्षक तसेच महाराष्ट्र शासनाची लेखी पूर्व परवानगी घेतल्याशिवाय प्रतिबंधित क्षेत्राच्या हद्दीत प्रवेश केल्यास किंवा ते मिळून आल्यास दोन वर्ष शिक्षा किंवा दंडाची कारवाई केली जाणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

Back to top button