शोध सुखाचा : सवय बदलाचे तंत्र | पुढारी

शोध सुखाचा : सवय बदलाचे तंत्र

सुजाता पेंडसे

बहुतेक वेळ कोणतीही सवय माणसाला जडते, तेव्हा ती अचानक सुरू झालेली असते. कुणाचं तरी पाहून, कुणाच्या सहवासात राहून, कुणाला तरी आदर्श मानून किंवा काही कारण नसतानाही एखादी सवय लागलेली असते. कारण नसताना, म्हणजे वरवर कुठलं कारण दिसत नसलं तरी मनाचा नीट शोध घेतला तर आत कुठेतरी त्याचा पत्ता लागतोच. म्हणून जेव्हा एखादी सवय सोडायची असेल तर मूळ कारण जाणून घ्या. अगदी छोटं उदाहरण घेऊया.

एका स्त्रीला आंबट पदार्थांची अ‍ॅलर्जी होती. म्हणजे काही वेळा तिच्या लक्षात आलं की, आंबट काही खालं की घसा दुखतो, खवखवतो, खोकला होतो. त्यानंतर तिने ‘आंबट पदार्थ न खाणे’ ही सवय लावून घेतली. तिचा अ‍ॅलर्जीचा त्रास आटोक्यात राहिला; पण त्या स्त्रीच्या तरुण मुलीलाही तसंच वाटायचं की, आपल्यालाही अ‍ॅलर्जी आहे. तिनेही आंबट पदार्थ सोडले. जेव्हा ती एकदा डॉक्टरांकडे काही कारणाने गेली तेव्हा त्यांनी तिला, लिंबू हे तिच्या आहारात असणे गरजेचे आहे, असं सांगितलं. तर तिने नकार दिला आणि त्याचे कारण सांगितले. तेव्हा डॉक्टरांनी तिला समजावले की, ‘तुझ्या आईला ही अ‍ॅलर्जी आहे का ते टेस्ट केलेय का?’ तर ती ‘नाही’ म्हणाली. मग डॉक्टरांनी तिला पटवलं की, ‘आंबट खायचे नाही ही सवय तू लावून घेतलीयस, ती तुझ्या आईकडे पाहून. परंतु तुला ‘सी’ व्हिटामिनसाठी ज्या काही गोष्टी सेवन कराव्या लागतील, त्यात आंबट फळं असतात. ज्याची शरीराला गरज आहे. त्यापूर्वी आपण हवे तर अ‍ॅलर्जी टेस्ट करू, आणि मग ही सवय तू सोडून देऊ शकतेस!’ डॉक्टरांकडून सविस्तर जाणून घेतल्यावर तिची ही भीती आणि सवय सुटली. म्हणजे ‘रुट कॉज’.. मूळ कारण काय आहे, याच्या मुळाशी गेलं, तर शोध लागतो आणि तो पटला की, सवय बदलण्यासाठी माणूस मनाने सज्ज होतो, त्याच्या अंतर्मनाला ते पटलेले असते.

आता सवयी बदलण्यासाठी नेमक्या काय कृती करायच्या ते बघू या.
बरेचदा काही गोष्टी नुसत्या मनातच ठरवून चालत नाही. त्या ‘नोट डाऊन’ कराव्या लागतात. म्हणून एखाद्या सवयीबद्दल तुमचा प्लॅन काय आहे, तो एका कागदावर लिहा.

म्हणजे ‘वजन कमी करणं’ हे तुमचं ध्येय असेल तर व्यायामाची सवय लावून घ्यायला हवी. ती कशी आणि काय प्रकाराची आहे, किंवा किती दिवसात हे ध्येय साध्य करायचं आहे, हे कागदावर स्पष्ट लिहून काढा. वाईट सवय सोडून नवी चांगली सवय लावायची असेल, तर काय ‘नको’ आणि काय ‘हवं’ ते डिटेल लिहिले पाहिजे. तसेच रोज त्यावर नजर टाकली पाहिजे.

दुसरी गोष्ट म्हणजे सवयीला उत्तेजित करणार्‍या गोष्टींपासून दूर राहायचं. काही लोक, काही जागा किंवा अजून काही ज्यामुळे ट्रिगर पॉईंट येतो. उत्तेजना मिळते त्यापासून लांब राहायचं. समजा, एखाद्या मॉलमध्ये गेलं की ‘अतिरिक्त खरेदी’ ही सवय लागली असेल, तर मॉलपेक्षा छोट्या ग्रोसरी स्टोअरमध्ये जायचं किंवा मॉलमध्येच जायचं असेल, तर मोजके पैसे घेऊनच जायचं तसंच दोनच वस्तूंची यादी करून तेवढ्यात आणायचा प्रयत्न करायचा. हे वारंवार करत राहायचं.

सवयीचं मूळ कारण शोधल्यानंतर हे लक्षात ठेवा की, तीव्र इच्छेला प्रतिसाद देणे हीसुद्धा तुम्हीच लावलेली सवय आहे. उदा. ‘तुम्ही तणावात असलात की, तुम्हाला ‘जंक फुड’ खाण्याची सवय लागलेली आहे.’ त्या तणावाचं कारण असतं वेगळंच, आणि तुमची कृती वेगळी असते. ‘ऑफिसमधले किंवा इतर ताणतणाव असू द्या. त्याचा ‘जंक फूड’ खाण्याशी काहीही संबंध नाही, हे मनाला व्यवस्थित पटवून द्या. अशा वेळी दुसरे काहीतरी करा. ‘गाणी ऐका!’, ‘व्यायाम करा!’, ‘आवडती फिल्म पाहा.’ किंवा असे काहीतरी जे त्या ‘तीव्र इच्छेला’ दूर ठेवेल. सुरुवातीला अगदीच शक्य झाले नाही, तरी किमान ‘हेल्दी’ फूड खाण्याचे लक्षात ठेवा. प्रथमतः हे अशक्य वाटेल; पण नंतर जमेल.
वाईट सवय सोडणे किंवा चांगली सवय लावणे, हे मनात आलं तरी झालं असं होणं शक्य नाही. इतका निग्रह सहसा माणसाकडे नसतोच. त्यामुळे सवय बदलण्यासाठी छोट्या छोट्या स्टेप्स घ्या. समजा, नियमित वर्कआऊट करायचा, ही सवय लावायची असेल तर आधी थोडेसे चालणे सुरू करा. मग थोडे जॉगिंग, मग धावणे आणि मग जिममध्ये जा. पाचच मिनिटांच्या व्यायामाने सुरुवात केलीतरी काही बिघडत नाही.

यानंतरची स्टेप म्हणजे जे ठरवलं आहे, त्यात नियमितता ठेवायला हवी. आज केलंय खरं, पण उद्या सुट्टी. अशा आळशी मानसिकतेला चार हात लांबच ठेवा.

सवय बदलण्यासाठी मनापासून प्रयत्न केले तर निश्चितपणे बदल दिसतात. अशा चांगल्या बदलासाठी स्वतःला काही बक्षीस द्या. ‘बक्षीस’ ही मानवी मनाला अत्यंत आकर्षित करणारी गोष्ट असते. म्हणून कधीतरी स्वतःची पाठ थोपटा किंवा स्वतःला रोज 10 पैकी 8 अशा पद्धतीने गुण द्या. किंवा कॅलेंडरवर त्या तारखेला पेनने बरोबर अशी खूण करा. प्रगती दिसली की आनंद वाढतो, समाधान वाढते.
तुमच्या ‘सवय बदल’ प्रोग्रॅममध्ये जवळच्या कुणालातरी सहभागी करून घ्या. जो तुमच्या ‘पुढे’ जाण्याला प्रोत्साहन देईल, कौतुक करेल.

असे व्यवस्थित प्लॅनिंग करून जर सवय बदलण्याचे प्रयत्न केले, तर नक्कीच हवे ते परिणाम दिसतात, ही सगळी जरी टेक्निकस असली तरी याहून महत्त्वाचे आहे ते तुम्ही स्वतःला चांगले ओळखत असल्याने कुठले तंत्र, कुठले बक्षीस किंवा कुठले आमिष आपल्याला आकर्षित करते. आपण कुठे काय खातो, आपले ट्रिगर पॉईंटस् विकनेसेस काय आहेत, हे तुम्ही व्यवस्थित जाणत असता. त्या सगळ्यांचा अभ्यास करूनच ‘सवय बदल’ घडवून आणता येतात.

तुमच्या मनाला निश्चित माहीत असते की, कोणती सवय ही चांगली आहे, आणि कोणती सवय स्वतःला घातक आहे. काहींना स्वतःच्या इच्छाशक्तीचा अभिमानही असतो; परंतु सवय बदलासाठी फक्त इच्छाशक्तीचा उपयोग होत नाही. आपल्या अंतिम साध्यासाठी कितीही त्रास सहन करावा लागला तरी तो करण्याची तयारी लागते. एखादी माता अपत्य जन्मासाठी काही काळ तीव्र प्रसूती वेदना सहन करते; तसे मनाच्या, शरीराच्या विकासाचे अपत्य जन्माला घालण्यासाठी गरजेइतका त्रास सहन करायला लागतो.

याचबरोबर सुप्त मनापर्यंत इच्छित विचार पोचण्यासाठी दररोज शांत प्रहरी, जी सवय हवी आहे त्याचे सविस्तर चित्रही मनःपटलावार रेखाटत राहा. न कंटाळता, मनःपूर्वक, उत्कटतेने ते करत राहा. कारण जागृत मन कॅमेर्‍यासारखे असते आणि सुप्त मन त्यातील ग्रहणक्षम लेन्ससारखे असते, ज्यावर बाह्य विचार किंवा चित्राचा ठसा उमटतो. हा ठसाच मग पुढे जाऊन ते विचार किंवा चित्र वास्तवात आणत असतो.

Back to top button