पंढरपूर : अधिक मासानिमित्त पंढरीत भाविकांची गर्दी | पुढारी

पंढरपूर : अधिक मासानिमित्त पंढरीत भाविकांची गर्दी

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा : दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या पंढरीत अधिक मासारंभानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी पावसातही मोठी गर्दी केली आहे. जास्तीत जास्त भाविकांना दर्शन मिळावे, म्हणून पाद्यपूजा बंद करण्यात आली आहे. तर श्री विठ्ठल व रुक्मिणीच्या होणार्‍या 45 तुळशी पूजेपैकी 30 पूजा बंद करण्यात आल्या आहेत. इतर 15 पूजाही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मंदिर समितीकडून सांगण्यात आले आहे.

हिंदू संस्कृतीमध्ये दर तिसर्‍या वर्षी एक महिना जास्त येतो. यास अधिक महिना म्हटले जाते. याला धार्मिक महत्त्व अधिक दिले गेले असल्याने या काळात तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी देवदर्शन, अन्नदान, वस्त्रदान तसेच विविध धार्मिक विधीसाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. मागील अधिक मासात कोरोनाचा संसर्ग असल्यामुळे अधिक महिन्याची पर्वणी भाविकांना साधता आली नाही. मात्र यंदा चातुर्मासातच अधिक महिना आल्यामुळे पंढरीत मोठ्या प्रमाणात गर्दी होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. अधिकमासारंभादिवशी मंगळवार 18 जुलै रोजी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी मोठी गर्दी केली होती. 18 जुलैपासून ते 14 ऑगस्ट या दरम्यान अधिक महिना आहे.

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने रोज रात्री 10.30 वाजता होणार्‍या 10 पाद्यपूजा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तर दिवसातून तीनवेळेस होणार्‍या 45 तुळसी पूजा पैकी 30 पूजा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर ऊर्वरित 15 तुळशीपूजाही बंद ठेवण्याबाबत चर्चा केली जात आहे. या पूजांमुळे काही तास दर्शन बंद ठेवावे लागते. यामुळे पदस्पर्श रांगेतील भाविकांना अनेक तास तिष्ठत थांबावे लागू शकते. श्री विठ्ठल व रूक्मिणीच्या रोज रात्री 10.30 वा. दहा पाद्यपूजा असतात. एका पूजेस पाच भाविकांना प्रवेश दिला जातो. यासाठी एक तासाचा कालावधी लागतो. तर तुळशीपूजा दिवसभरात तीनवेळा होतात. एकावेळेस 15 व दिवसभरात 45 पूजा होतात. एका पूजेस पाच भाविक उपस्थित राहू शकतात. यामुळे सर्वच तुळशीपूजा बंद ठेवण्याचा निर्णय लवकरच जाहीर केला जाणार आहे.

Back to top button