एफआरपी आम्ही वाढवली; मोठ्या नेत्याने काय केले? : पंतप्रधान मोदी | पुढारी

एफआरपी आम्ही वाढवली; मोठ्या नेत्याने काय केले? : पंतप्रधान मोदी

माळशिरस; पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्रातील नेते केंद्रात कृषिमंत्री होते. या मोठ्या नेत्याने उसाच्या एफआरपीसंबंधी काय केले, असा सवाल करत त्यांच्या काळात उसाची एफआरपी क्विंटलला केवळ 200 रुपये होती. ती आम्ही साडेतीनशे रुपये केली, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर नाव न घेता मंगळवारी पुन्हा टीकास्त्र सोडले.

माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस येथील कृषी विभागाच्या मैदानात प्रचार सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते. आपल्या भाषणात मोदी यांनी शेतकर्‍यांसाठी राबवलेल्या योजनांचा आढावा घेतला. साखर कारखान्यांचे जुने इन्कमटॅक्स आमच्या सरकारने माफ केले. काँग्रेसचा पंजा शेतकर्‍यांना लुटत होता. परंतु आम्ही तीन हजार कोटी रुपये शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केले. पूर्वी इथेलॉनची निर्मिती 40 हजार लिटर होत होती. आता ती 500 कोटी लिटर होत आहे. साहजिकच त्याचा फायदा शेतकर्‍यांना झाला आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले. विकसित भारत बनवण्यासाठी महिलांची भूमिका मोठी व महत्त्वाची आहे. पुढील काळात तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचा संकल्प असल्याचा पुनरुच्चार मोदी यांनी यावेळी केला.

मोदी म्हणाले, काँग्रेसने आपल्या 60 वर्षांच्या कारकिर्दीत ‘गरिबी हटाव’चा नारा दिला व सत्ता उपभोगली. आम्ही दहा वर्षांत 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले. 80 कोटी लोकांना रेशन दहा वर्षे मोफत देण्यात आले. हे सरकार रस्ते, रेल्वे, विमानतळ याच्या विकासासाठी खर्च करत आहे. काँग्रेस सरकारने साठ वर्षांत रस्ते, रेल्वेसाठी जेवढा खर्च केला, तेवढा खर्च रस्ते व रेल्वे विकासासाठी आमच्या सरकारने एक वर्षात केला. प्रत्येक घरात, शेतात पाणी पोचवण्याचा माझा संकल्प आहे.

 स्वातंत्र्यानंतर अयोध्येत राम मंदिर होणे अपेक्षित होते. काँग्रेसने राम मंदिरासाठी आडकाठी आणली. परंतु तुम्ही केलेल्या मतदानामुळे पाचशे वर्षांनी अयोध्येत राम मंदिर निर्माण झाले. हेे केवळ आपल्या ताकदीचे बळ आहे, असे मोदी म्हणाले.
यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उमेदवार खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, शिवसेनेच्या नेत्या नीलम गोरे आदी उपस्थित होते.

Back to top button