सोलापूर : टँकर घोटाळ्याप्रकरणी फौजदारीचे आदेश | पुढारी

सोलापूर : टँकर घोटाळ्याप्रकरणी फौजदारीचे आदेश

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा महापालिकेच्या माध्यमातून टँकरने नागरी वस्त्यांना करण्यात येणार्‍या पाणीपुरवठ्यात झालेल्या 90 लाखांच्या घोटाळ्याबाबत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिल्याची माहिती महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी गुरुवारी पत्रकारांना दिली. सन 2017-18 या वर्षात विभागीय कार्यालय क्र. 2 मध्ये हा घोटाळा मक्तेदाराच्या संगनमताने करण्यात आला होता. सन 2016-17 मध्ये टँकरनेपाणीपुरवठ्यासाठी 18 लाखांचा खर्च आला होता. त्याच्या दुसर्‍या वर्षी चक्क 90 लाखांचा खर्च झाल्याचे दाखविण्यात आले होते. याप्रकरणी नगरसेवकांच्या तक्रारीमुळे हे प्रकरण उजेडात आले होते. बोगस खेपा दाखवून संगनमताने हा गैरप्रकार करण्यात आला होता. तत्कालीन झोन अधिकारी अतुल भालेराव यांच्यासह इतरांचा या घोटाळ्यात सहभाग होता.

टँकर पाणीपुरवठ्याच्या खेपांमध्ये परस्पर वाढ दाखवून 90 लाखांचा घोटाळा करण्यात आला होता. अशी तक्रार करण्यात आली होती. हा घोटाळा उघडकीस येऊ नये म्हणून टँकर पाणीपुरवठासंदर्भातील रजिस्टरही गायब करण्यात आले होते. याप्रकरणी भालेराव यांची विभागीय चौकशी करण्यात आली होती. या चौकशीत गैरकारभार झाल्याचे स्पष्ट झाल्याने याप्रकरणी भालेराव यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत.

वर्षभरात 21 विभागीय चौकशा

महापालिकेशी संबंधित 21 विविध घोटाळ्यांप्रकरणी वर्षभरात 21 विभागीय चौकशा झाल्या आहेत. या चौकशीत ज्यांच्याविरोधात ठपका ठेवण्यात आला अशांविरोधात कारवाई करण्यात येणार आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

चिमणीप्रश्‍नी 7 सप्टेंबरला सुनावणी

सिद्धेश्‍वर साखर कारखान्याच्या चिमणीबाबत डीजीसीएने कारखान्याला म्हणणे मांडण्यासाठी 31 ऑगस्टपर्यंत मुदत दिली आहे. लवकरच डीजीसीए अंतिम निर्णय देणार आहे. यानंतर मनपाकडून 7 सप्टेंबरला सिध्देश्‍वर साखर कारखान्याची सुनावणी घेण्यात येणार आहे, असेही आयुक्त म्हणाले.

Back to top button