पंढरपूर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत | पुढारी

पंढरपूर तालुक्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा :  ऑगस्ट महिना संपत आला तरी पंढरपूर तालुक्यात दमदार पाऊस झालेला नाही. त्यामुळे अद्यापही विहिरींनी तळ गाठलेलेच आहेत. तर ओढे, नाले देखील कोरडेच पडलेले आहेत. सुुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण केल्या आहेत. तर हीच पिके आता पाण्यावाचून सुकू लागली आहेत, करपू लागली आहेत. या पिकांना आता पाण्याची गरज भासू लागली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांचे डोळे आकाशाकडे लागले असून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
पावसाळ्याचे सुरुवातीचे अडीच महिने निघून गेले.

सद्या देखील श्रावण महिनादेखील संपत आला आहे. तरी देखील पावसाचा पत्ता नाही. श्रावण महिन्यात पाऊस पडेल, अशी शेतकर्‍यांना आशा होती. मात्र, ही आशा मावळली आहे. मागील वर्षाचा अनुभव पाहता शेतकर्‍यांनी मोठ्या धाडसाने खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. याकरिता महागडे बी बियाने, खते, औषधे यावर मोठा खर्च केला आहे. परंतु, पाऊस लांबू लागला असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पेरणी केलेली मका, तूर, उडीद, सूर्यफूल आदी पिके करपू लागली आहेत. पाऊस पडला तरच पिकांना जीवदान मिळणार आहे. अन्यथा शेतकर्‍यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे.

दरवर्षी पावसाळ्यात ऑगस्टमध्ये पावसाच्या पाण्याने ओढे, नाले भरुन वाहत असतात. मात्र, यंदा पाऊस लांबला आहे. जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने शेतकर्‍यांची निराशा केली आहे. त्यामुळे ओढे, नाले कोरडे पडलेले आहेत. तर विहिरींनीदेखील तळ गाठलेला आहे. तर माळरानावरील विहीरी अद्यापही कोरड्या ठाक पहलेल्या आहेत. त्यामुळे पेरणी केलेल्या पिकांना पाणी कोठून द्यायचे हा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर पडला आहे. बहुतांश शेतकर्‍यांनी ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. याला देखील पाण्याची कमतरता भासू लागली आहे.

पाऊस आलाच तर हलका ते मध्यम स्वरुपाचा येतो. या पावसामूळे जमिनीत ओल तयार होत नाही. या उलट रिमझिम पावसामुळे शेतात गवत, तन जास्त वाढत चालले आहे. यामुळे शेतकर्‍यांना सातत्याने जमिनीची मशागत करावी लागत आहे.

नीरा उजवाच्या पाण्यावर मदार
पाऊस समाधानकारक झालेला नाही. त्यामुळे विहिरी अद्यापही कोरड्या पडलेल्या आहेत. यामुळे खरिपाची पेरणी केलेल्या पिकांना एकतर पावसावर अवलंबून राहावे लागणार आहे. पाऊस लांबला असल्याने शेतकर्‍यांना आता निरा उजवा कालवा, उजनी डावा व उजवा कालव्यास सुरू असलेल्या आवर्तनाचाच आधार मिळत आहे. कालव्याचे पाणी कधी मिळेल, याची शाश्‍वती नसल्याने देखील शेतकरी चिंताग्रस्त झाले असून पावसाची आतूरतेने वाट पाहत आहेत.

Back to top button