सातारा : गॅस गळतीमुळेच मुजावर कॉलनीत स्फोट | पुढारी

सातारा : गॅस गळतीमुळेच मुजावर कॉलनीत स्फोट

कराड; पुढारी वृत्तसेवा : येथील मुजावर कॉलनीतील शरीफ मुल्ला यांच्या घरी झालेला भीषण स्फोट हा गॅस गळतीमुळेच झाल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे. त्यामुळे बुधवारी स्थानिक नागरिकांकडून सुरू असणार्‍या तर्कवितर्कांना पूर्णविराम मिळाला आहे.

बुधवारी सकाळी कराडमधील मुजावर कॉलनीमध्ये वास्तव्यास असणार्‍या शरीफ मुल्ला यांच्या घरी भीषण स्फोट झाला होता. यात शरीफ मुल्ला यांच्या घरातील चौघांसह शेजारील अशोक पवार यांच्या घरातील पाच जण जखमी झाले आहेत. तर सुमारे सहा घरांचे मोठे नुकसान झाले आहे. स्फोटाची तीव्रता व झालेले नुकसान पाहता हा स्फोट गॅस गळतीमुळेच झाला का ? याबाबत संभ्रमावस्था होती. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांकडूनही तर्कवितर्क लढविले जात होते. मात्र शरीफ मुल्ला यांच्यासह जखमींकडून गॅस गळतीनंतरच ही घटना घडल्याचे सांगितले जात होते. त्यामुळेच पोलिसांनी सर्व शक्यता गृहीत धरूनच तपास केला जात होता.

अप्पर पोलिस अधीक्षक आँचल दलाल या सुद्धा दुपारपासून सायंकाळपर्यंत कराडमध्ये ठाण मांडून बसल्या होत्या. पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांच्यासह पोलिस निरीक्षक प्रदीप सूर्यवंशी यांनीही पाहणी करून डॉग स्कॉडसह पुण्यातील रिजनल फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला पाचारण केले होते. सायंकाळी पुण्याहून फॉरेन्सिक लॅबच्या पथकाने पाहणी केल्यानंतर या दुर्दैवी घटनेमागे गॅस गळती हेच कारण असल्याचे समोर आले आहे. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल दोन ते तीन दिवसांत प्राप्त होईल, असा अंदाज पोलिस उपअधीक्षक अमोल ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, तिघा जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांनी सांगितले.

स्ट्रक्चरल ऑडिट होणार

गॅस स्फोटात जखमी झालेल्या मुल्ला यांच्या घरासह अन्य घरांचे स्ट्रक्चरल ऑडिट होणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी म्हणून कराड नगरपालिकेच्या बांधकाम खात्याच्या अधिकार्‍यांकडून मुल्ला यांच्यासह नुकसानग्रस्त घरांची पाहणी करण्यात आली.

Back to top button