मंत्रालयात नोकरी लावतो म्हणून पाच लाखांची फसवणूक | पुढारी

मंत्रालयात नोकरी लावतो म्हणून पाच लाखांची फसवणूक

कराड : पुढारी वृत्तसेवा

मंत्रालयात नोकरी लावतो म्हणून दोघांची पाच लाखांची फसवणूक केली. याप्रकरणी कराड तालुका पोलीस ठाण्यात कोल्हापूर जिल्ह्यातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत गणेश जगन्नाथ पवार (रा. चचेगाव, ता. कराड) यांनी फिर्याद दिली आहे. हिम्मतराव बाळू निंबाळकर (रा. मोगरायाचीवाडी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) असे फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. तर ओंकार राजेंद्र माळी व प्रथमेश अशोक हर्षे अशी फसवणूक झालेल्या दोघांची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, फिर्यादी गणेश पवार व संशयित हिंमतराव निंबाळकर यांची काही महिन्यांपूर्वी ओळख झाली होती. त्या ओळखी दरम्यान हिम्मतराव निंबाळकर यांने आपण मंत्रालयात नोकरीस असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी हिम्मतराव निंबाळकर याने मुंबई मंत्रालयात सहा जागा भरावयाच्या आहेत असे गणेश पवार यांना सांगितले. त्यावेळी गणेश पवार यांनी दोघांना नोकरी लावायचे असल्याचे निंबाळकर याला सांगितले.

अडीच लाख रुपये भरण्यास सांगितले

त्यानंतर निंबाळकर याने त्यासाठी पैसे द्यावे लागतील असे सांगून एका उमेदवारासाठी अडीच लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार गणेश पवार यांनी निंबाळकर यांच्या सांगण्यावरून ७ जुलै २०२१ रोजी मीना कांतीलाल नगारे यांच्या बँक खात्यावर ५० हजार रुपये भरले. तर त्याच दिवशी महेश विष्णू हर्षे याच्या बँक खात्यावरून महेश प्रजापती यांच्या बँक अकाउंटवरती ५० हजार रुपये व प्रथमेश अशोक हर्षे यांच्या बँक अकाउंटवरून मीना नगारे यांच्या बँक खात्यावरती ५० हजार पाठवले.

त्यानंतर ओमकार माळी व प्रथमेश अशोक हर्ष यांना कामास लावण्यासाठी तीन लाख पन्नास हजार रुपये रोख हिम्मतराव निंबाळकर याच्याकडे दिले. असे दोघांना नोकरी लावण्यासाठी हिम्मतराव निंबाळकर याला पाच लाख रुपये दिले. मात्र त्यानंतर निंबाळकर हा गणेश पवार व इतरांचा फोन उचलत नव्हता. तसेच त्याचा संपर्कही होत नव्हता. त्यामुळे गणेश पवार यांनी एक दिवस मंत्रालयात जाऊन खात्री केली असता हिम्मतराव निंबाळकर नावाची व्यक्ती मंत्रालयात नोकरीस नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येतात गणेश पवार यांनी हिम्मतराव निंबाळकर याच्याविरोधात कराड तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक रेखा दुधभाते अधिक तपास करत आहेत.

दरम्यान अशा स्वरूपाची नोकरीस लावतो म्हणून आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास किंबहुना संशयित व्यक्तीने आणखी कोणाला फसवले असल्यास संबंधितांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन सपोनि रेखा दुधभाते यांनी केले आहे.

अधिक वाचा :

Back to top button