LSG vs MI : मुंबई इंडियन्सचा ‘दीन’वाणा पराभव; लखनौ सुपर जायंटस्ची तिसर्‍या स्थानी झेप | पुढारी

LSG vs MI : मुंबई इंडियन्सचा ‘दीन’वाणा पराभव; लखनौ सुपर जायंटस्ची तिसर्‍या स्थानी झेप

लखनौ; वृत्तसंस्था : मुंबई इंडियन्सच्या मागे लागलेले पराभवाचे शुक्लकाष्ठ संपता संपेना. मंगळवारी झालेल्या सामन्यात लखनौ सुपर जायंटस्ने मुंबईला 4 विकेटस्नी हरवून गुणतालिकेत तिसर्‍या स्थानी झेप घेतली. मुंबईची फलंदाजी पुन्हा ढेपाळली. त्यांनी फक्त 144 धावा फलकावर लावल्या. लखनौने मार्कस स्टोईनिसच्या 62 धावांच्या जोरावर हे आव्हान 4 चेंडू शिल्लक ठेवून गाठले. मुंबईचे दहा सामने झाले असून, त्यापैकी त्यांनी 3 जिंकले आहेत, तर 7 हरले असल्याने स्पर्धेतील त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे.

लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमवर 144 धावांचे रक्षण करणार्‍या मुंबईला ड्रीम स्टार्ट मिळाला. सलामीवीर अर्शिन कुलकर्णी हा पहिल्याच चेंडूवर बाद झाला. नुवान तुषाराच्या गोलंदाजीवर तो पायचित ठरला. मुंबईला दुसरे यश कर्णधार पंड्याने मिळवून दिले. त्याने राहुलला 28 धावांवर बाद केले. सीमारेषेवर मोहम्मद नबीने उत्कृष्ट संतुलन साधत त्याचा झेल घेतला. यानंतर मार्कस स्टोईनिस आणि दीपक हुडा यांची जोडी जमली. दोघांची भागीदारी 40 धावांवर पोहोचली असताना हार्दिकने हुडाला (18) बाद करून आपली दुसरी विकेटस् मिळवली. त्यानंतर स्टोईनिसने 39 चेंडूंत अर्धशतक झळकावले. पुढे त्याने आक्रमक खेळ केला. नबीवर हल्ला चढवताना चौकार, षटकार ठोकला; परंतु दुसरा षटकार ठोकताना मात्र तो तिलक वर्माच्या हातात फसला. तिलक वर्माने अगदी काठावर त्याचा झेल टिपला. स्टोईनिसने 45 चेंडूंत 62 धावा केल्या.

यावेळी लखनौला 31 चेंडूंत 30 धावा हव्या होत्या. तुषाराने पुढच्या षटकात 6 धावा दिल्या; तर बुमराहने फक्त एक धाव दिली, त्यामुळे 18 चेेंडूंत 22 धावा, असे समीकरण उरले. 18 व्या षटकात कोएत्झीने 1 विकेट घेतली; परंतु 9 धावा दिल्या, त्यामुळे 12 चेंडूंत 13 धावांची लखनौला आवश्यकता होती. हार्दिक पंड्याच्या या षटकात बदोनी दुर्दैवी धावचित झाला, त्याची बॅट क्रीझमध्ये गेली; परंतु अंतराळी राहिल्यामुळे त्याला बाद देण्यात आले. पंड्याच्या या षटकात 10 धावा गेल्या, त्यामुळे शेवटच्या षटकात दोन चेंडूंत राहिलेल्या 3 धावा घेत निकोलस पूरनने सामना संपवला.

तत्पूर्वी, लखनौचा कर्णधार के. एल. राहुल याने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहसीन खानने दुसर्‍याच षटकात रोहितला (4) बाद केले आणि त्यानंतर सूर्यकुमार यादवही 6 चेंडूंत 10 धावांवर स्टॉईनिसच्या गोलंदाजीवर लोकेश राहुलच्या हाती झेल देऊन परतला. लोकेशने अचूक डीआरएस घेतला. लखनौच्या गोलंदाजांनी मुंबईच्या धावगतीला ब्रेक लावला होता. मुंबईला चौकार मिळणेही अवघड होऊन बसले होते. तिलक वर्मा (7) सहाव्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर रनआऊट झाला. हार्दिक पंड्याला गोल्डन डकवर नवीन-उल-हकने माघारी पाठवून मुंबईची अवस्था 4 बाद 22 अशी केली. पॉवर प्लेमध्ये मुंबईला 4 बाद 28 धावाच करता आल्या आणि यंदाच्या पर्वातील एखाद्या संघाची ही दुसरी खराब कामगिरी आहे. पंजाब किंग्जने हैदराबादविरुद्ध 3 बाद 27 धावा केल्या होत्या. मुंबईला 10 षटकांत 4 बाद 57 धावांपर्यंत मजल मारता आली.

नेहल वढेरा व इशान किशन यांनी पाचव्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली होती; परंतु रवी बिष्णोईने गुगलीवर ही जोडी तोडली. इशान 32 धावांवर झेलबाद झाल्याने मुंबईला 80 धावांवर पाचवा धक्का बसला. नेहल चांगली फटकेबाजी करत होता; परंतु मोहसीन खानने अप्रतिम यॉर्करवर त्याचा त्रिफळा उडवला. नेहल 41 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह 46 धावांवर बाद झाला. 19 व्या षटकात मयंक यादवने मोहम्मद नबीचा (1) त्रिफळा उडवला. टीम डेव्हिडने 18 चेंडूंत नाबाद 35 धावा करून मुंबईला 7 बाद 144 धावांपर्यंत पोहोचवले.

सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णीचा गोल्डन डक

सोलापूरच्या अर्शिन कुलकर्णी याने लखनौकडून पदार्पण केले. तो इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आला; पण तो पहिल्याच चेंडूवर गोल्डन डक होऊन माघारी परतला. त्याच्या आयपीएल कारकिर्दीची सुरुवात भोपळ्याने झाली. त्याला नुवान तुषाराने पायचित केले. डीआरएसमध्ये तो बाद ठरला. तुषाराची ही पहिलीच आयपीएल विकेट ठरली. तो सूर्यकुमारच्या जागी इम्पॅक्ट प्लेअर म्हणून गोलंदाजीला आला होता.

Back to top button