ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक झाली. यानंतर या स्टारकिडचे एनसीबी कार्यालयाच्या आतील फोटो, व्हिडिओज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. व्हायरल झालेल्या एका फोटोत टक्कल असलेल्या एका व्यक्तीने आर्यन खान सोबत सेल्फी घेतल्याचे दिसून आले. लोकांना वाटले की हा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी आहे. पण एनसीबीने यावर खुलासा केला आहे. शाहरुखच्या मुलासोबत सेल्फी घेणारा व्यक्ती हा एनसीबीचा अधिकारी अथवा कर्मचारी नसल्याचे एनसीबीकडून सांगण्यात आले आहे.
क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने बॉलिवूडचा किंग शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान (वय २३) याच्यासह ८ जणांना अटक केली. आर्यनने चरसचे सेवन केल्याचे उघड झाले आहे. आर्यनसह त्याचा जवळचा मित्र अभिनेता अरबाज सेठ मर्चंट आणि मुनमून धमेचा याला कोर्टासमोर उभे केल्यानंतर एक दिवस एनसीबी कोठडी सुनावण्यात आली होती. आर्यनचा वकील सतीश मानीशिंदे यांनी कोर्टासमोर दावा केला की आर्यनला आयोजकाकडून पार्टीसाठी निमंत्रित करण्यात आले होते.
एनसीबीने तिघांकडून १३ ग्रॅम कोकेन, ५ ग्रॅम एमडी, २१ ग्रॅम चरस, एमडीएमएच्या २२ गोळ्या आणि एक लाख ३३ हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त केला होता. एनसीबीचे अधिकारी पर्यटक बनून 'कॉर्डेलिया द एम्प्रेस' क्रूझवर गेले होते. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी या पथकाचे नेतृत्व केले. क्रूझ खोल समुद्रात गेल्यावर रेव्ह पार्टी सुरू झाली. पार्टीत अंमली पदार्थांचे सेवन सुरू झाल्याचे पाहिल्यावर एनसीबीच्या पथकाने धडक कारवाई केली.
पहा व्हिडिओ : जेव्हा आपल्या माणसाचं बोलणं न बोलताच आपल्याला कळतं.. | Swami Motors |Pre-owned Cars