Ajit Pawar : डबघाईला आलेल्या कारखान्यावर का जात नाही? - पुढारी

Ajit Pawar : डबघाईला आलेल्या कारखान्यावर का जात नाही?

वाई : पुढारी वृत्तसेवा

काहीजण चांगल्या चाललेल्या कारखान्यावर जावून चांगले काम करणार्‍यांना त्रास देत आहेत. मात्र, डबघाईला आलेल्या कारखान्यावर ते का जात नाहीत? विरोधकांच्या कारखान्यावरही का जात नाहीत? त्यांच्या पक्षात गेल्यानंतर गोमुत्र शिंपडून आंघोळ घालतात की काय?, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar )  यांनी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर अप्रत्‍यक्ष टीका केली. वाई येथील विविध विकासकामांच्या उद्‍घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी अजित पवार ( Ajit Pawar ) अजित पवार यांनी सोमय्यांचा नामोल्लेख टाळून त्यांच्यावर जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले, लोकांना दोन पैसे भाव द्या, कामगारांना योग्य वेतन द्या, बोनस द्या; पण हे नाही. स्वत: काय करायचे नाही अन् दुसरं कोण करत असेल तर त्यामध्ये अडचणी निर्माण करायच्या. चुकीचं कोणीच करु नये, चुकीच समर्थन मी कधी करणारच नाही, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

जे काही कायद्याने, नियमाने, संविधानाने सांगितले आहे त्याच्याबाहेर जायचं नाही. मात्र त्यांच्याकडून जाणीवपूर्वक लोकांच्यामध्ये दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. गोबेल्स् नीती वापरायची. एकच गोष्ट पन्नासवेळा सांगितली की ती खरी वाटायला लागते. या पद्धतीचे राजकारण महाराष्ट्राच्या इतिहासात आत्तापर्यंत कधीही घडत नव्हतं, असेही ते म्‍हणाले.

दुसर्‍या पक्षात गेला की लगेच त्याची चौकशी लागते

त्यांच्या पक्षामध्ये माणूस गेला की, तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होतो. त्याच्यावर गोमुत्र शिंपडून आंघोळ घालतात की काय, काय माहित, असा टोलाही त्‍यांनी लगावला. त्यांच्या पक्षातून दुसर्‍या पक्षात गेला की लगेच त्याची चौकशी लागते. पण त्यांच्या पक्षात गेले की कुणाला खासदारकी मिळाली, कुणाला मंत्रीपद मिळालं. कुणाला आमदारकी मिळाली. ज्या काही तक्रारी होत्या त्याही बंद झाल्या. हे राजकारण ओळखण्यासाठी जनता काही दूधखुळी नाही. सगळ्या गोष्टी कळतात, असेही अजित पवार म्‍हणाले.

हेही वाचलं का? 

 

Back to top button