सातारा : दबाव मोडीत काढण्यासाठी एकत्रित या : रामराजे नाईक निंबाळकर | पुढारी

सातारा : दबाव मोडीत काढण्यासाठी एकत्रित या : रामराजे नाईक निंबाळकर

उंब्रज; पुढारी वृत्तसेवा : सध्या प्रशासनावर दबाव टाकून ज्या पद्धतीचे राजकारण सुरू आहे, ते मोडीत काढणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वानी एकत्रित येऊन ताकद दाखवावी, असे आवाहन विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी केले. तसेच भाषणे करून मते मिळविता येत नाहीत, असा उपरोधिक टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

उंब्रज येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादीचे नेते सारंग पाटील, सुनिल माने, तालुकाध्यक्ष देवराज पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव जाधव, जयवंतराव जाधव, सरपंच योगराज जाधव, उपसरपंच सौ. सुनंदा जाधव यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी ज्यांना हिंदुत्व शब्द लिहता येत नाही, ते आम्हाला काय हिंदुत्व शिकविणार ? असा उपहासात्मक टोला त्यांनी लगावला. तसेच ज्यांच्याकडे विकासाची राजकीय परंपरा आहे, व्हिजन आहे त्यांच्या पाठीमागे जनता असते असेही रामराजे नाईक – निंबाळकर यांनी सांगितले. खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, शर्यत अजून पूर्ण झालेली नाही. ती पूर्ण करायची आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी ताकदीने तळागाळापर्यंत जात राष्ट्रवादी काँग्रेसचे ध्येयधोरणे सामान्यापर्यंत पाहचवणे आवश्यक आहे. त्यासाठी तरुणांना एकत्र आणून वैचारिक ताकद निर्माण केली पाहिजे, असे मत खासदार पाटील यांनी व्यक्त केले, आमदार बाळासाहेब पाटील म्हणाले, बाहेरचे लोक मतदारसंघात येऊन आपण वेगळे काहीतरी करीत आहे असे दाखविण्यासाठी टिका करत आहेत. आपण सहकारमंत्री व पालकमंत्री असताना मंजूर केलेल्या कामांना स्थगिती देत सामान्यांवर अन्याय केला जात असल्याचेही आमदार बाळासाहेब पाटील यांनी सांगितले. आ. शशिकांत शिंदे म्हणाले, ईडी व कायद्याचा वापर करून केंद्रातील लोक सत्तेचा गैरवापर करीत आहेत. इतिहास घडवायचा असेल, तर परिणामांचा विचार करत बसू नका. आपली लढाई हुकूमशाही विरोधात असल्याचे आमदार शिंदे यांनी सांगितले. यावेळी सुनिल माने, देवराज पाटील, मानसिंगराव जगदाळे, सौ. संगिता साळुंखे, प्रशांत यादव, लालासाहेब पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक माजी पंचायत समिती सदस्य अ‍ॅड. प्रमोद पुजारी यांनी केले. आभार माजी पंचायत समिती सदस्य सोमनाथ जाधव यांनी मानले.

Back to top button