Nashik Income Tax Department raid : आयकर विभाग कारवाईत कोट्यवधींचे घबाड | पुढारी

Nashik Income Tax Department raid : आयकर विभाग कारवाईत कोट्यवधींचे घबाड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा – आर्थिक माहिती दडवल्याच्या संशयातून आयकर विभागाने शहरातील नामांकित सराफासह बांधकाम व्यावसायिकावर टाकलेल्या धाडीत कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तांचे घबाड उघडकीस आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे. आयकर विभागाने दुसऱ्या दिवशीही धाडसत्र सुरूच ठेवले असून, त्यात महत्त्वाची कागदपत्रे तसेच काही रोकड ताब्यात घेतल्याचे समजते. आयकर विभागाच्या या धाडसत्रामुळे शहरातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत.

गेल्या काही महिन्यांपासून आयकर विभागाकडून नाशिकमध्ये सातत्याने धाडी टाकल्या जात आहेत. सराफ तसेच बांधकाम व्यावसायिक आयकर विभागाच्या रडारवर असल्याचे यापूर्वीच्या कारवाईतून समोर आले आहे. तसेच या व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपयांची मायादेखील जप्त केली आहे. शुक्रवारी (दि. २४) देखील शहरातील कॅनडा कॉर्नर येथील नामांकित सराफासह बांधकाम व्यावसायिकावर आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकत तपास केला. यावेळी कार्यालय तसेच निवासस्थानावर छापा टाकत महत्त्वपूर्ण कागदपत्रांसह काही रोकड जप्त केल्याची माहिती समोर येत आहे. छापासत्र दुसऱ्या दिवशीही म्हणजेच शनिवारी (दि. २५) देखील सुरूच होते. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी या सराफाच्या दोन्ही दालनांमध्ये तपासणी करण्यासाठी दालने बंद केली आहेत. सोने-चांदी खरेदीसह दागिन्यांचे व्यवहार दडवणे आणि हवाला रॅकेटचा संशय पथकास असून, त्यादृष्टीने अधिकाऱ्यांकडून तपास केला जात आहे. बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालय आणि निवासस्थानावर छापा टाकून तपास केला जात आहे. तपासासाठी गेल्या दोन दिवसांपासून आयकर विभागाचे पथक नाशिकमध्ये तळ ठोकून असून, दोघांच्याही व्यवहारांचा सखोल तपास केला जात असल्याची माहिती समोर येत आहे.

दोन पथकांकडून कसून तपास

आयकर विभागाच्या दोन पथकांकडून स्वतंत्रपणे कसून तपास केला जात आहे. त्यातील एका पथकाने मनमाड येथे कसून तपास करून त्या ठिकाणाहून महत्त्वपूर्ण कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. दरम्यान, दुसऱ्या दिवशीदेखील अधिकाऱ्यांचे तपाससत्र कायम असल्याने, कॅनडा कॉर्नर येथील दालनास अधिकाऱ्यांच्या वाहनांचा वेढा दिसून आला.

हेही वाचा:

Back to top button