अपेक्षा वाढल्याने वधू-वर सूचक मंडळे हतबल; मुलगी मिळत नसल्याने वरपिता चिंतेत | पुढारी

अपेक्षा वाढल्याने वधू-वर सूचक मंडळे हतबल; मुलगी मिळत नसल्याने वरपिता चिंतेत

धनंजय जगताप

मारूल हवेली : नोकरी व स्थिरस्थावरच्या मागे लागल्यामुळे मुला-मुलींची लग्न जुळून येत नाहीत. त्यामुळे वाढते वय तसेच अव्वाच्यासव्वा अपेक्षा वाढल्यामुळे वधु-वर सूचक मंडळे व नाव नोंदणी केलेल्या वर पालकांनी अक्षरश: हात टेकले आहेत. त्यातच पै-पाहुण्यांकडून देखील अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने इच्छुकांच्या लग्नाचा खेळखंडोबा कायम आहे.

लग्नसराई सुरू आहे, लग्न जुळवण्याचा व्यवसायही तेजीत आहे असे म्हटले जाते. मात्र आज वधू-वर सूचक मंडळात नाव नोंदणी केलेल्या मुलींच्या पालकांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याचे मत अनेक वधू -वर चालकांनी व्यक्त केले. गेल्या तीन चार वर्षात विवाह नोंदणी संस्था तेजीत होत्या. मात्र वाढत्या अपेक्षामुळे आता विवाह नोंदणी संस्था समाजाकडून बदनाम होवू लागल्या आहेत. विवाह नोंदणी केलेला बायोडाटा देऊनही मुलींकडील मंडळी प्रतिसाद देत नाहीत. याला विवाह संस्था कशा काय जबाबदार आहेत, असा सवाल काहीजण उपस्थित करतात.

एकेकाळी लग्न जुळवणे म्हणजे पुण्याचे काम समजले जात होते. मात्र आता त्याला व्यावसायिकतेचे स्वरुप आले आहे. मुला-मुलींची वाढती वये, लग्नाबाबतच्या अपेक्षा, नोकरदार मुलांची कमी संख्या, वेळेत लग्न जुळवण्यासाठी पालकांची व्याकुळता या सर्वांचा फायदा विवाह नोंदणी कार्यालयांना होत असून त्यातून हजारो रुपयांची उलाढाल होत आहे. त्यातून विविध पॅकेजेस करून काहीजणांकडून वधू-वर पालकांची लूट केली जात आहे. मुलांच्या तुलनेत मुलींचा जन्मदर कमी असला तरी उच्चशिक्षित मुलींची संख्या मात्र मुलांच्या तुलनेत जास्त आहे. त्यांच्या लग्नाविषयी भावी जोडीदाराबाबतच्या अपेक्षाही वाढल्या आहेत. तर उच्चशिक्षित आणि स्थिरस्थावर मुलांची संख्या त्या तुलनेत कमी आहे. त्यामुळे उपवर मुलांच्या पालकांमध्ये वधू संशोधनासाठी कसरत करावी लागत आहे. शहरासह ग्रामीण भागात असणार्‍या वधू-वर सूचक मंडळांचा सुळसुळाट वाढला आहे. नाव नोंदणी करताना ठराविक कालावधी व ठराविक सेवेच्या विविध पॅकेजचा फंडा या मंडळांकडून वापरला जात असतो. नाव नोंदणीसाठी आलेल्या वधू-वर पालकांना संस्थेचे दरपत्रक पुढे केले जाते.

हजारो रुपये खर्चून ठरलेल्या वेळेत लग्न जुळले नाही तर पुन्हा पैसे भरुन पुन्हा नोंदणी केली जाते. पूर्वी मुला-मुलींच्या लग्रासाठी स्थळ पाहताना कुटुंबातील मुख्य व्यक्तीला चपला झिजवाव्या लागत होत्या, आता घर बसल्या मोबाईलवर स्थळ शोधली जात आहेत. मात्र, त्यासाठी काही हजार रूपये देखील खर्चावे लागत आहेत. काही वर्षांपूर्वी पाहुण्यात पाहुणे होण्याची प्रथा होती. मुलगी नातेवाइकांच्या मुलाला देण्यास प्राधान्य दिले जायचे. मात्र, सध्या हा गोतावळा मागे पडत चाललाय. मुलगी पाहुण्यात नव्हे तर पाहुण्याच्या पाहुण्याला देण्यासही अपवाद वगळता कोणी उत्सुक नसल्याचे दिसते.

Back to top button