सातारा : मंद्रूळकोळे पूल मोजतोय अखेरच्या घटका | पुढारी

सातारा : मंद्रूळकोळे पूल मोजतोय अखेरच्या घटका

सणबूर; तुषार देशमुख : 1964 साली वाहतुकीला खुला झालेला 57 वर्षे वयाचा आणि गेल्या 8 ते 10 वर्षांपासून खड्डे अन् प्रशासनाचे दुर्लक्ष यासारख्या दुर्धर आजाराने ढेबेवाडी-नवारस्ता रस्त्यावरील मंद्रूळ कोळे परिसरातील वांग नदीवरील पूल अखेरची घटका मोजत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याने मरणासन्न अवस्थेत पोहोचलेला हा वयोवृद्ध कोणत्याही क्षणी नामशेष होऊ शकतो. त्यामुळेच सार्वजनिक बांधकाम विभाग किमान आतातरी किमान डागडुजीची शस्त्रक्रिया करून पुलाला जीवदान देणार का? याकडे लक्ष लागले आहे.

लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नातून सन 1962 ते 1964 या कालावधीत झालेला हा पूल दरवर्षी पावसाळ्यात महापुरात पाण्याखाली जातो. त्यामुळेच तो अखेरच्या घटका मोजत आहे. मागील वर्षी तर पुलाची मोठी हानी होऊन काही भाग तुटल्याने हा पूल धोकादायक बनला आहे. या पुलाची भयावह परिस्थिती लक्षात घेत 8 ते 9 वर्षांपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी मंद्रूळ पुलासह नवारस्ता – ढेबेवाडी मार्गासाठी 11 मंजूर केले होते. मात्र पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर झाली नाही. त्यानंतर विधानपरिषद सदस्य नरेंद्र पाटील यांनीही 2.75 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. पण, पूल आणि केटीवेअर ही संकल्पना पाटबंधारे विभागाने नाकारली आणि पुढे काहीच झाले नाही. राज्याचे विद्यमान उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनीही या पुलासाठी महाविकास आघाडी शासन काळात 6.50 कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. मात्र, शासनाच्या डिझाईन सर्कलकडून पुलाचे डिझाईन प्राप्त झालेले नाही, असे बांधकाम विभागाकडून सांगितले जात आहे. त्यामुळे 10 वषार्ंत तिसर्‍यांदा निधी मंजूर होऊनही या पुलाचे काम होणार की नाही? असा संभ्रम कायम आहे.

वाहने कोसळण्याची भीती

मागील वर्षी पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. त्यावर तात्पुरती मलमपट्टी करून वाहतूक सुरू आहे. सुदैवाने यंदा आजवर महापूर येईल, असा मोठा पाऊस झालेला नाही. मात्र कधी कोणती दुर्घटना घडेल? हे कोणीच सांगू शकत नाही, अशी परिस्थिती आहे. संरक्षक कठडे नाही, रेलिंग नाही आणि धोक्याची सूचना देणारे फलकही गायब आहेत. नदीच्या बाजूचा स्लॅब उखडला असून वाहने थेट नदीत कोसळण्याचा धोका असून या भयावह परिस्थितीकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे.

मागील वर्षभरापासून जीव धोक्यात घालून पुलावरून वाहतूक सुरू आहे. बांधकाम खात्यासह प्रशासन एखाद्या निष्पापाचा बळी गेल्यावर जागे होणार का? अशी परिस्थिती आहे. तीनदा निधी मंजूर होऊनही पुलाचे काम का होत नाही? हे न उलगडणारे कोडे बनले आहे.
– अभिजित पाटील, जिल्हा कार्यकारिणी सदस्य, राष्ट्रीय काँग्रेस सातारा जिल्हा.

Back to top button