कराड : सफाई कामगार मृत्यू प्रकरणातून बोध घेण्याची गरज | पुढारी

कराड : सफाई कामगार मृत्यू प्रकरणातून बोध घेण्याची गरज

कराड; प्रतिभा राजे :  कराड येथील कराड ग्रामीण भागात असणार्‍या वाखाण रोडवरील अंडरग्राऊंड ड्रेनेज साफ करताना चेंबरमध्ये पाय घसरून पडून गुदमरल्यामुळे पालिकेच्या सफाई कर्मचार्‍याचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे कराडचे अवघे जन हळहळले आहे. साफसफाई करताना एखाद्याचा जीव जातो ही कराडच्या स्वच्छ प्रतिमेला गालबोट लावणारी घटना आहे. साफसफाई कर्मचार्‍यांना प्रशिक्षण आणि सुरक्षा किट दिल्यानंतरच ड्रेनेजच्या सफाईचे काम दिले जाते असे नगरपालिकेचे म्हणणे आहे. मात्र असे असले तरी जीवघेणे काम करत असणार्‍या या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला असून या घटनेतून बोध घेणे गरजेचे आहे.

1974 साली कराडचे शिल्पकार स्व. पी. डी. पाटील यांच्या कालावधीत भुयारी गटारी योजना करण्यात आली. सुमारे 15 ते 20 फूट खोल चेंबर त्यावेळी काढण्यात आले होते. वाखाण परिसरामध्ये काढण्यात आलेली चेंबरची खोली इतर चेंबरपेक्षा अधिक प्रमाणात आहे. त्यावेळी केलेली ड्रेनेज व्यवस्था शहरासाठी उपयुक्त ठरली आहे. ड्रेनेज सफाईचे काम आवश्यकतेनुसार करण्यात येते. मात्र 1974 पासून ते 2022 पर्यंतच्या 48 वर्षांत ड्रेनेजचे काम करताना कर्मचार्‍याला दुखापत किंवा मृत्यू झाल्याची घटना घडली नाही. मात्र
दुर्दैवाने बुधवारी पालिकेच्या कर्मचार्‍याला गुदमरून आपला प्राण गमवावा लागला.

ज्यावेळी ड्रेनेज साफसफाईचे काम करण्यात येते त्यावेळी सफाई कर्मचार्‍यांसह सुपरवायझरही उपस्थित असतात. बुधवारी दुपारी 3 वाजता ड्रेनेज सफाईच्या कामास सुरुवात करण्यात आली. यावेळी अनिरुद्ध लाड इतर चार ते पाच कर्मचारी तसेच सुपरवायझर अनिल गवळी उपस्थित होते. चेंबरमध्ये रॉड टाकून पाणी सफाई करण्याचे काम सुरू करावयाचे होते. मात्र, पाय घसरल्याने अनिरुद्ध चेंबरमध्ये पडला. चेंबरमध्ये ऑक्सिजनची कमतरता असल्याने अनिरुद्धला आपला प्राण गमवावा लागला.  त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या दोघांपैकी एकजण दोरीच्या सहाय्याने वर आला मात्र दुसरा बेशुद्ध पडला. त्याचवेळी मुख्याधिकारी, अधिकारी व नागरिक, कर्मचार्‍यांच्या मदतीने अनिरुद्धला बाहेर काढण्यात आले. मात्र तोपर्यंत उशिर झाला होता.

अनिरुद्धच्या मृत्यूमुळे कराड पालिकेचे कर्मचारी धास्तावले आहेतच परंतु नागरिकही सुन्न झाले आहेत. मात्र, या घटनेमुळे पालिकेला सतर्क राहण्याची गरज आहे. ड्रेनेज साफसफाई करताना चेंबर उघडले जाते अशावेळी घ्यावयाच्या सुरक्षेची व कर्मचार्‍यांना दुखापत झाल्यावर त्यासाठी तरतूदीची आवश्यकता नगरपालिकेने करणे गरजेचे आहे. या घटनेतून पालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांनी बोध घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे. विविध संघटना, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिकांनी पालिकेने कर्मचार्‍यांना द्यावयाच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून याबाबत अनेक चर्चा शहरामध्ये सुरू आहेत. तसेच या मृत्यूची चौकशी करण्याची मागणीही होत आहे.

पालिकेने चौकशी समिती गठित केली

अनिरुद्ध लाड याचा मृत्यू पाय घसरून चेंबरमध्ये पडून झाला असला तरी याबाबत मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी चौकशी समिती गठित केली आहे. या चौकशी समितीमध्ये उपमुख्याधिकारी विशाखा पवार, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, आस्थापना अधिकारी किशोर पवार यांची नियुक्ती केली असल्याचे डाके यांनी सांगितले आहे.

पालिकेचा स्थापना दिन कार्यक्रम रद्द

15 सप्टेंबर 1855 साली कराड नगरपरिषदेची स्थापना झाली.त्यामुळे दरवर्षी 15 सप्टेंबर रोजी कराड नगरपरिषदेचा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात येतो. मात्र या स्थापना वर्धापनदिनाच्या आदल्याच दिवशी दुर्दैवी घटना घडल्याने या दिवशीचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले. सर्व कर्मचारी या घटनेने सुन्न झाल्याचे दिसून येत होते. अनिरूध्द हा त्याच्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कुटुंबीयांना मदतीची मागणी

अनिरूद्ध लाड याच्या कुुटुंबीयांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत द्यावी तसेच या घटनेसंदर्भात चौकशी समिती नेमावी व त्याचा अहवाल सादर करावा, अशी मागणी अखिल भारतीय सफाई मजदूर संघटना, भीमशक्ती संघटना यांनी मागणी केली आहे. याबाबत बैठक घेण्यात आली असून यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष अशोक माहुडा, सातारा जिल्हाध्यक्ष आनंदराव लादे यांची उपस्थिती होती.

अनिरूद्ध लाड याच्या कुटुंबीयांना जास्तीत जास्त मदत देण्यासाठी आम्ही प्रयत्न करू आहोत. तसेच या पुढे कर्मचार्‍यांच्या सुरक्षेबाबत आम्ही अधिक काळजी घेणार आहोत. कर्मचार्‍यांची सुरक्षा आमच्यासाठी महत्त्वाची आहे.
– रमाकांत डाके,
मुख्याधिकारी, कराड

Back to top button