चॉईस नंबरमधून आरटीओची कोटींची उड्डाणे; १ क्रमांकासाठी ९ लाख मोजले | पुढारी

चॉईस नंबरमधून आरटीओची कोटींची उड्डाणे; १ क्रमांकासाठी ९ लाख मोजले

सातारा; पुढारी वृत्तसेवा : नवे वाहन खरेदी केल्यानंतर आकर्षक क्रमांकासाठी पैसे मोजण्याची तयारी असणार्‍यांची संख्या जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढू लागली आहे. चॉईस नंबरच्या माध्यमातून सातारा प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाला 6 कोटी 60 लाख 34 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. सगळ्यात 1 क्रमांकाने सर्वाधिक भाव खाल्ला असून या क्रमांकासाठी वाहनधारकाने तब्बल 9 लाख रुपये मोजले आहेत. त्यामुळे आकर्षक नंबरच्या हौसेसाठी लाखो रुपयांचा निधी वाहनधारकांनी आरटीओकडे मोजले आहेत.

आपल्या वाहनाच्या नंबरप्लेटकडे इतरांचे लक्ष वेधून घेण्याचा बर्‍याच जणांचा कल असतो. लक्ष वेधून घेणारा चॉईस नंबर जेवढा आकर्षक तेवढी पत मोठी, असा समज अनेकांचा असतो. त्यामुळे वाहनांना आकर्षक नंबर घेण्याचे फॅड सातारा जिल्ह्यात चांगले वाढले असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. शुभ आणि आकर्षक आकडा वाहनाच्या क्रमांकात असावा, अशी अनेकांची इच्छा असते. अशा काही आकर्षक क्रमांकासाठी प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) शुल्क निर्धारीत केले आहे. त्यानुसार ज्या वाहनधारकांना आवडीचे व आकर्षक तसेच शुभअंक वाहनाच्या क्रमांकात पाहिजे असतात. त्यासाठी काही वाहनधारकांनी हवा तोच क्रमांक मिळवण्यासाठी क्रमांकाच्या लिलावात सहभाग घेतला होता. या लिलावातही वाहनधारकांनी मागेपुढे न पाहता आकर्षक क्रमांकासाठी लाखो रुपये भरुन हे वाहन क्रमांक मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत.

गेल्या वर्षभरात प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडे आकर्षक क्रमांकासाठी 8 हजार 82 वाहनधारकांनी नोंदणी केली होती. या आकर्षक क्रमांकातून आरटीओला 6 कोटी 60 लाख 34 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. म्हणतात ना, हौसेला मोल नसते त्याची प्रचिती अनेकांना येत असते. परंतू सातारकर प्रत्येक गोष्टीत आपले वेगळेपण जपत आहेत. सातार्‍यातील नागरिकांनी आपल्या
वाहनाच्या पसंतीच्या क्रमांकासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यातून आरटीओच्या तिजोरीत चांगल्या प्रमाणात महसूल जमा
झाला आहे.

प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत आकर्षक क्रमांकासाठी ऑनलाईन प्रक्रिया असून यासाठी लिलावही घेण्यात येतो. वाहनधारकांच्या आकर्षक क्रमांकामुळे आरटीओ कार्यालयाच्या महसूलात वाढ होत आहे.
-विनोद चव्हाण,
प्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा.

Back to top button