पुढारी ऑनलाईन डेस्क : Stock Market Closing Bell : राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) शुक्रवारी (दि.७) पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांची निवड केली. याचे सकारात्मक पडसाद शेअर बाजारात उमटले. BSE सेनसेक्स (७६,६९३.३६) आणि निफ्टि ५० (२३,२९०.१५) या दोन्ही निर्देशांकामध्ये जवळपास २ टक्के इतकी वाढ नोंदवली गेली.
आज (दि. ७) सकाळी नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा निफ्टि ५० हा निर्देशांक २२,८१४ अंकावर खुला झाला. तर बाँबे स्टॉक एक्सचेंजचा सेनसेक्स हा निर्देशांक ७७,०३६.५१ अंकांवर खुला झाला.
दुपारी १२ वाजून ५६ मिनिटांनी BSE सेनसेक्स ७६००० वर होता, तर निफ्टि ५० हा निर्देशांक २३,१०० वर होता. आजच्या दिवशी टॉप गेनर्सच्या यादीत विप्रो, इन्फोसिस, बजाज फायनान्स, टाटा स्टील, महिंद्रा अँड महिंद्रा, बजाज फिनसर्व्ह या कंपन्यांची नावे आघाडीवर राहिली तर दुपारी १ वाजून ३ मिनिटांच्या निर्देशांकनुसार फिनोलेक्स केबल्स, प्रेस्टिज इंडिया, मिंडा कॉर्प, निप्पान लाईफ एएमसी, होम फर्स्ट फायनान्स या कंपन्या मात्र टॉप लुजर्सच्या यादीत होत्या.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो दर हा ६.५ टक्के इतका कायम ठेवला. या वेळी बँकेने महागाईचा दर या वर्षी ४ टक्के राहील, असेही स्पष्ट केले. बँकेने भारताचा विकासदर ७.२ टक्के राहील असा अंदाजही वर्तवला आहे.
त्यामुळे निफ्टीसाठी शॉर्टटर्म ट्रेंड हा सकारात्मक राहिलेला आहे, पण तरीही बाजारात अस्थिरता मात्र कायम असल्याचे चित्र दिसले. एचडीएफसी सिक्युरिजचे नागराज शेट्टी म्हणाले, "निफ्टीने २२२५०चा अडथळा पार केला आहे. यानंतरची पातळी आता २३२०० असेल. तर तातडीची सपोर्ट लेव्हल २२६४० राहील."
आज आशियातील बाजारात संमिश्र स्थिती दिसून आली. हँगसेंग फ्युचरमध्ये ०.४ टक्के इतकी वाढ झाली होती, तर जपानच्या टॉपिक्स मात्र स्थिरता दिसून आली. ऑस्ट्रेलियाचा ASX200मध्ये ०.२ टक्के इतकी वाढ राहिली. तर युरो स्टॉक्स ५० फ्युचरमध्ये ०.७ टक्के इतकी वाढ नोंदवण्यात आली.
अमेरिकेत S&P 500 आणि नॅसडॅक थोड्या कमी पातळीवर बंद झाले आहेत. तर डोवजोन्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. सुरुवातीला S&P 500 आणि नॅसडॅक दोन्ही इंट्राडेमध्ये चांगले वधारले होते. पण तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्याची कामगिरी घसरल्याने दोन्ही निर्देशांकामध्ये घट नोंदवली गेली.
फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी (FPIs) गुरुवारी ६,८८७ कोटींचे शेअर्स विक्री केली आहे. तर भारतीय गुंतवणुकदारांनी ३,७१८ कोटींची विक्री केली आहे. परकीय गुंतवणुकदारांनी केलेला विक्रीचा मारा, कच्चा तेलाचे वाढते दर यामुळे भारतीय रुपाया डॉलरच्या तुलनेत ९ पैशांनी घसरल्याचे चित्र दिसले.