थोरले नानासाहेब पेशव्यांचे कर्तृत्व दुर्लक्षित : डॉ. उदय कुलकर्णी

थोरले नानासाहेब पेशव्यांचे कर्तृत्व दुर्लक्षित : डॉ. उदय कुलकर्णी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : थोरले नानासाहेब पेशवे यांचे कार्य मोठे आहे. त्यांनी अनेक मोहिमा केल्या आहेत. त्यांच्या काळात मराठेशाही उच्च पदावर पोहचली. किती युद्धे जिंकली, यावरून त्यांच्या कर्तृत्वाचे आकलन होत नाही. त्यांचा विशाल दृष्टिकोन, राजनीती, प्रशासकीय कौशल्ये असे त्यांचे अनेक पैलू आहेत. परंतु, काही ना काही कारणामुळे त्यांचे कार्य लोकांच्या नजरेआड गेले आहे, असे मत इतिहास अभ्यासक डॉ. उदय कुलकर्णी यांनी व्यक्त केले.

पर्वतीवरील श्री देवदेवेश्वराच्या 273 व्या स्थापना दिनानिमित्त श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या वेळी श्री देवदेवेश्वर संस्थानचे (पर्वती आणि कोथरूड) मुख्य विश्वस्त रमेश भागवत, विश्वस्त जगन्नाथ लडकत, सुधीर पंडित, आशिष कुलकर्णी उपस्थित होते. पेशव्यांचे वंशज पुष्करसिंह पेशवा यांच्या हस्ते अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. 'श्रीमंत नानासाहेब पेशवे आणि पुणे' या विषयावर डॉ. उदय कुलकर्णी यांचे व्याख्यान या वेळी झाले.

डॉ. उदय कुलकर्णी म्हणाले, थोरले नानासाहेब पेशव्यांचा दरारा इतका मोठा होता, की त्यांचे काम युद्ध न करता एका पत्रावर व्हायचे. नानासाहेबांवर अनेक आरोप, प्रत्यारोप झाले. परंतु, अभ्यास केल्यावर त्यांच्या प्रत्येक कृतीमागे अर्थ असल्याचे लक्षात येते. कात्रज तलावातून पाणीपुरवठा, पर्वती मंदिर, सारसबाग, आंबिल ओढा वळवणे, लकडीपूल मंदिर अशी अनेक मोठी कामे त्यांच्या काळात झाली. आज पुण्यात त्यांचे एकही स्मारक नाही, एकाही चौकाला किंवा रस्त्याला त्यांचे नाव नाही, ही खंत वाटते. रमेश भागवत म्हणाले, पर्वतीवरील श्री देवदेवेश्वराच्या 273 व्या स्थापना दिनानिमित्त श्रीमंत थोरले नानासाहेब पेशवे यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या ठिकाणी पुढच्या टप्प्यात युद्ध स्मारक देखील होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news