सातारा : कसणी खोरे संपर्कहिन होण्याची भीती | पुढारी

सातारा : कसणी खोरे संपर्कहिन होण्याची भीती

सणबूर ; पुढारी वृत्तसेवा : पावसाचा जोर वाढल्याने ओढ्यावरील पुलाचा भराव वाहून जाण्याची चिन्हे, प्रवाह मोकळा करण्यासाठी ग्रामस्थांची धडपड सुरू झाल्याचे पहायला मिळत आहे. अनेक दुर्गम गावे व वाड्यावस्त्यांच्या दळणवळणासाठी उपयुक्त असलेला आणि भरावाच्या तात्पुरत्या मलमपट्ट्यांनी सांधलेला ढेबेवाडी विभागातील दुर्गम कसणी गावाजवळचा पुल पावसाचा जोर वाढल्याने पाण्याखाली जावून त्यावर टाकलेला भरावही वाहून जाण्याची भीती आहे. पुलापलीकडील कसणी, घोटील, निगडे, म्हाईंगडेवाडीसह अनेक वाड्यावस्त्या संपर्कहीन होण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थांनी कालपासून पाण्यात उतरून वाळूने तुंबलेल्या पुलाच्या पाईप मोकळ्या करण्याचे काम हाती घेतले आहे.

ढेबेवाडी खोर्‍यातील निवी, कसणी, घोटील, निगडे, म्हाइंगडेवाडी आदी 25 हून अधिक दुर्गम गावे व वाड्यावस्त्यांना जोडणारा पवारवाडी-म्हाइंगडेवाडी हा मार्ग असून रात्रंदिवस त्यावरून वाहनांची ये-जा असते. यामार्गावरील पवारवाडीजवळचा कमी उंचीचा पूल पावसाळ्यात सतत पाण्याखाली जात असल्याने दोन वर्षांपूर्वी अवघ्या चाळीस दिवसांतच नव्याने बांधण्यात आला आहे. मात्र, याच मार्गावर पुढे कसनी जवळ असलेल्या कमी उंचीच्या धोकादायक पुलाकडे दुर्लक्ष केल्याने दळणवळण ठप्प होण्याची पावसाळ्यातील समस्या तशीच कायम राहिली आहे. गेल्यावर्षी जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीत कसणी जवळचा पूल उद्ध्वस्त झाला होता. अनेक दिवस दळणवळण ठप्प राहिल्याने कसणी, निगडे, घोटील, म्हाईंगडेवाडी व लहान मोठ्या आठ वाड्या वस्त्यातून मेंढ व तळमावले येथील शाळा महाविद्यालयात शिक्षणासाठी जाणारे विद्यार्थी घरातच अडकून पडले होते. त्यानंतर ओढ्यातील वाळू व दगड गोट्यांचा भराव पुलावर टाकून दळण वळण सुरळीत झाले.

गेल्या वर्षभरात तुटलेल्या पुलाच्या जागी नवीन पुल न बांधल्याने यंदाचाही पावसाळा या गावांसाठी खूपच त्रासाचा ठरणार आहे. ज्या ओढ्यावर पूल आहे त्याला अनेक मोठे ओढे नाले मिळतात. अतिवृष्टीचा परिसर असल्याने पूरसदृश स्थिती होते. पावसाने जोर धरल्याने पाणीपातळीत वाढ होवून पुलावरून पाणी जाण्याची चिन्हे होती, असे झाल्यास. दळणवळणाचा महत्त्वाचा आधार असलेली एस. टी. बस सेवाही ठप्प होण्याची भीती असल्याने ग्रामस्थांनी पुरात उतरून गाळ व वाळूने तुंबलेल्या ओढ्याच्या पाईप रिकाम्या केल्या. सरपंच महेंद्र गायकवाड, तंटामुक्तीचे अध्यक्ष पांडुरंग मेथे- पाटील यांच्यासह ग्रामस्थ या मोहिमेत उस्फूर्तपणे सहभागी झाले होते. आज या कामासाठी जेसीबीचीही मदत घेण्यात आली.

Back to top button