सातारा : जिल्ह्यात वन विभागाच्या कारवाया थंडावल्या | पुढारी

सातारा : जिल्ह्यात वन विभागाच्या कारवाया थंडावल्या

सातारा : पुढारी वृत्तसेवा

उन्हाची वाढलेली तीव्रता व अन्य कारणांमुळे गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत जिल्ह्यातील वन विभागाकडून केल्या जाणार्‍या कारवाया थंडावल्या आहेत. या कालावधीत वणवे लावणार्‍यांचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई झाली आहे. परंतु, प्राण्यांची शिकार किंवा तस्करीप्रकरणी कारवायांचे प्रमाण कमी झाल्याचे चित्र आहे. यासाठी प्रत्येक भागात गस्त वाढवणे गरजेचे बनले आहे.

गतवर्षी सातारा वनविभागामध्ये बहुतांश अधिकारी नवीन आले आहेत. यातील काही जणांना जिल्ह्यातील कामकाजाचा अनुभव आहे तर काही जण अननुभवी आहेत. उपवनसंरक्षक म्हणून आलेल्या महादेव मोहिते यांनी सर्व अधिकार्‍यांची चांगली मोट बांधली आहे. त्यांनी यापूर्वी सातार्‍यात सहाय्यक वनसंरक्षकपदी काम केल्याने त्यांना जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीचे पूर्ण ज्ञान आहे. याचाच उपयोग ते कारभारात करत आहेत. सर्व अधिकार्‍यांची मोट बांधून त्यांनी वन्य प्राणी व वन संरक्षणाचे काम सुरू केले आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये सर्वच तालुक्यांत वन विभागाने धडाधड कारवाया केल्या. अवैध लाकूड, वृक्षतोड, वणवा, वन्य प्राण्यांची शिकार, प्राण्यांच्या अवयवांची तस्करी असे गुन्हे उघडकीस आणले आहेत. त्यामुळे एकप्रकारे शिकार्‍यांवर वचक बसवण्यात वन विभाग काही प्रमाणात यशस्वी झाला आहे. परंतु, अजूनही काही भागात शिकारींचे सत्र सुरू आहे. हे थांबवण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत.वाई, जावली, पाटण व महाबळेश्वर हे तालुके वनक्षेत्राबाबत संवेदनशील असल्याने या ठिकाणी गांभीर्याने काम करण्याची आवश्यकता आहे.

जून 2021 च्या दरम्यान अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर फेब्रुवारी 2022 पर्यंत कारवायांचा धडाका सुरू होता. परंतु, त्यानंतर मार्च एंडिंगच्या कामाचा व्याप अधिकार्‍यांवर आला. त्यामुळे इतर कामे प्रलंबित पडू लागली आहेत. त्यातच उन्हाळ्यात वणवे लागल्यास ते आटोक्यात आणण्यासाठी कर्मचारी प्रयत्नशील झाले. मात्र, या सर्व प्रकारामुळे शिकारी व तस्करीकडे सर्रास दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे.
कास पठार परिसर, महाबळेश्वरचा पश्चिम भाग, जोर-जांभळी खोरे, अनेक ठिकाणचे कोअर क्षेत्र येथे शिकारी सुरूच आहेत. दुष्काळी भागातही छोट्या छोट्या प्राण्यांची शिकार करून त्यांची चोरी छुपे मांसविक्री सुरू आहे. वनविभागाचा हात ढिला पडू लागल्यानेच शिकार्‍यांचे फावत आहे. शिकार्‍यांवर वन विभागाचा होल्ड कायम ठेवण्यासाठी गस्तीसह कारवाया करणे गरजेचे बनले आहे.

शिकार्‍यांना कर्मचार्‍यांची मदत

काही ठराविक भागातील शिकार्‍यांना वन विभागाच्याच कर्मचार्‍यांची मदत होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. वृक्षतोड प्रकरणात यापूर्वीही दोघांना निलंबित करण्यात आले होते. यासह बर्‍याच प्रकरणात कर्मचार्‍यांचा कामचुकारपणा किंवा भ्रष्ट कारभार समोर आल्याने उपवनसंरक्षकांनी पाच ते सात जणांना निलंबित केले. यामुळे वन विभागाचीच प्रतिमा डागाळत आहे. यासाठी झारीतील शुक्राचार्यांचा शोध घेऊन दणका देण्याची गरज निर्माण झाली आहे.

Back to top button