सातारा : झेडपीत मार्च एंडिगची लगीनघाई ;ठेकेदारांची गर्दी वाढली | पुढारी

सातारा : झेडपीत मार्च एंडिगची लगीनघाई ;ठेकेदारांची गर्दी वाढली

सातारा : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्याचे मिनीमंत्रालय म्हणून ओळखल्या जाणार्‍या सातारा जिल्हा परिषदेच्या विविध विभागात मार्च एंडिंगची लगीनघाई सुरु झाली आहे. विविध विभागात खर्चाचा ताळेबंद अहवाल देण्याची लगबग तर कुठे ठेकेदारांनी आपल्या कामाची बिले घेण्यासाठी गर्दी केली आहे. गुरुवार दि. 31 मार्च रोजी आर्थिक वर्षाची सांगता होत आहे. शासकीय कामकाजासाठी 10 दिवसाचा कालावधी राहिला आहे. त्यामुळे सकाळपासूनच सातारा जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालये, बँका, पतसंस्थेमध्ये अधिकारी व कर्मचार्‍यांची एकच धावपळ सुरु झाली होती.

मार्च एंडिंगच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम विभाग, पाटबंधारे विभाग, विज वितरण कंपनी, लघु पाटबंधारे विभाग यासह सर्वच शासकीय कार्यालयाबाहेर दिवसभर अलिशान वाहनांची वर्दळ वाढली होती. जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयात अधिकारी व कर्मचारी तसेच ठेकेदारांची धावपळ सुरु होती. मार्च एंडिंगमुळे सर्वच कार्यालयांचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू होते.तसेच कोट्यवधी रुपयांचा आलेला निधी विविध योजनांवर खर्च करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेबरोबरच सरपंच व ठेकेदार यांची धावपळ सुरु होती. 100 टक्के खर्च करण्यासाठी आणि जास्तीत जास्त फाईली हातावेगळ्या करण्यासाठी कार्यवाही सुरु आहे.

दरवर्षी विविध शासकीय कार्यालयात मार्च महिना जवळ आला की विविध कामाची पुर्तता करण्याची लगीनघाई अधिकारी व कर्मचारी करत असतात. मात्र वर्षभर हे अधिकारी व कर्मचारी काय काम करत असतात असा सवालही या निमित्ताने पुढे येत आहे. अनेकदा मार्च एंडिंगच्या नावाखाली अन्य कामांना फाटा दिला जातो. मार्च एंडिंगच्या नावाखाली कार्यालयात अधिकारी व कर्मचार्‍यांचे जे प्रकार सुरू असतात त्याला लगामही घालणे तितकेच गरजेचे आहे. मार्च एंडिंगमध्ये शासकीय योजनांचा निपटारा करण्यापेक्षा अधिकारी व कर्मचारी ठेकेदारांच्या विविध कामांची बिले काढून आपले स्वत:चे उखळ पांढरे करुन घेत असतात असे प्रकार विविध शासकीय कार्यालयात मार्च एंडिंगच्या पार्श्‍वभूमीवर पहावयास मिळत आहेत.

हेही वाचलात का ?

Back to top button