Sangali: सांगलीत पाठलाग करून तरुणाचा खून | पुढारी

Sangali: सांगलीत पाठलाग करून तरुणाचा खून

सांगली पुढारी वृत्तसेवा:  येथील सिव्हिल चौक ते बसस्थानक या रस्त्यावर रोहन रामचंद्र नाईक (वय 29, रा. लक्ष्मीनारायण कॉलनी, शंभर फुटी) या तरुणाचा पाठलाग करून धारदार हत्याराने वार करून खून करण्यात आला. मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. सात जणांच्या टोळीने हा हल्ला केला असावा, असा संशय आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत सांगली (Sangali) शहर पोलिस ठाण्यात नोंद झालेली नव्हती.

घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रोहन हा कार पेटिंगची कामे करीत होता. आज रंगपंचमी असल्याने काम बंद होते. सायंकाळी पाचच्या सुमारास तो एका बारमध्ये गेला होता. त्या ठिकाणी संशयित सातजण बसले होते. त्यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाला. तो वाद मिटला होता.

त्यानंतर रोहन बारमधून बाहेर पडून सिव्हिल चौकाकडे जात होता. त्यावेळी त्या टोळक्याने रोहनचा पाठलाग सुरू केला. एकाने गुप्तीने त्याच्या पाठीत वार केला. त्यामुळे तो खाली कोसळला. त्यानंतर आणखी तीन वार करण्यात आले. त्यामुळे तो जागीच ठार झाला.

हल्ल्याच्या प्रकारानंतर परिसरातील दुकाने बंद झाली. लोकांची गर्दी झाली होती. मृतदेह सिव्हिलमध्ये नेला. पोलिस उपअधीक्षक अजित टिके, सांगली शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक अजय सिंदकर, विश्रामबाग पोलिस ठाण्याचे निरीक्षक एस. के. पुजारी सिव्हिल परिसरात आले होते. त्यांनी संशयितांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या.

दोन खुनांमुळे सांगलीत खळबळ

सांगलीपासूनच लगतच असलेल्या हरिपूर येथे सोमवारी रात्री उशिरा आरटीओ एजंटचा खून झाला. त्यानंतर मंगळवारी सायंकाळी मुख्य रस्त्यावर तरुणाचा पाठलाग करून खून झाल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती.

Back to top button