सातारा : बारावीची आजपासून परीक्षा | पुढारी

सातारा : बारावीची आजपासून परीक्षा

सातारा : पुढारी वृत्तसेवा
शैक्षणिक क्षितीजावरील महत्त्वपूर्ण टप्पा असलेली बारावीची परीक्षा शुक्रवार दि. 4 मार्चपासून सुरू होत असून 7 एप्रिलपर्यंत ती चालणार आहे. जिल्ह्यात 272 केंद्रांवर 37 हजार 508 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. कोरोनामुळे अभ्यासावर मोठा परिणाम झाला असून बोर्डाच्या परीक्षेचे या विद्यार्थ्यांवर टेन्शन आहे. असे असले तरी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जाण्यासाठी हे विद्यार्थी सज्ज झाले आहेत.

शैक्षणिक जगतात बारावीची परीक्षा हा महत्वपूर्ण टप्पा समजला जातो. कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरित परिणाम झाला आहे. विशेषत: यावर्षी दहावी व बारावीची बोर्डाची परीक्षा देणारे विद्यार्थी पुरेसा अभ्यास न झाल्याने गांगरून गेले आहेत. तरीही झालेला अभ्यास व जिद्दीच्या जोरावर आजपासून ते परीक्षा देत आहेत. जिल्ह्यात बारावीची मूळ परीक्षा केंद्रे 50 असून शाळा तेथे परीक्षा केंद्र यानुसार 222 उपकेंद्राची नव्याने भर पडली आहे. बारावीच्या 15 पेक्षा कमी पट असणार्‍या 19 शाळा असून या शाळेतील विद्यार्थी मूळ परीक्षा केंद्रात परीक्षा देणार आहेत. बारावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर कॉपी सारख्या प्रकाराला आळा घालण्यासाठी 7 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर, प्राथमिक शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, निरंतर शिक्षणाधिकारी, डाएट प्राचार्य, माध्यमिक उपशिक्षणाधिकारी, ज्येष्ठ अधिव्याख्याता डाएट, महिला पथक अशी 7 पथके परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. परीक्षा केंद्रासाठी 50 केंद्रांना 50 मुख्य केंद्र संचालक, 222 उपकेंद्रांना 222 उपकेंद्र संचालक, 1 हजार 500 पर्यवेक्षक, 322 शिपाई, 272 लेखनिकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

पेपरची ने – आण करण्यासाठी 222 रनर, 15 कस्टेडीयन, 50 सहाय्यक कस्टेडीयन असे मिळून 2 हजार 653 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी दिली. सहाय्यक कस्टेडियन मुख्य केंद्रावर व रनर उपकेंद्रावर पूर्ण वेळ थांबून बैठे पथक म्हणून काम करणार आहेत.

ताण न घेता मोकळेपणाने परीक्षा द्या…

बारावीच्या सर्व परीक्षा केंद्र व उपकेंद्रावर बैठक व्यवस्था, पुरेसे साहित्य व इतर सुविधा लाईट, पाणी उपलब्ध करण्यात आल्या आहेत. तसेच परीक्षा केंद्रावर 144 कलम लागू करण्यात आले आहे. याशिवाय परीक्षा केंद्रावर पोलिस दलातर्फे चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परीक्षा सुरळीत पार पडावी, यासाठी ही तयारी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी कोणताही ताण न घेता मोकळेपणाने परीक्षा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button