शंभर खाटांचे रुग्णालय जनतेला आधार ठरेल : पालकमंत्री सुरेश खाडे | पुढारी

शंभर खाटांचे रुग्णालय जनतेला आधार ठरेल : पालकमंत्री सुरेश खाडे

सांगली, पुढारी वृत्तसेवा : शंभर खाटांचे जिल्हा रुग्णालय व माता-बाल संगोपन रुग्णालय जनतेला आधार ठरेल, अशी ग्वाही पालकमंत्री सुरेश खाडे यांनी दिली.

येथील शासकीय रुग्णालयाच्या आवारात बांधण्यात येणार्‍या जिल्हा रुग्णालय व माता-बाल संगोपन रुग्णालयाचे रविवारी पालकमंत्री खाडे यांच्याहस्ते भूमिपूजन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. ही दोन्ही रुग्णालये प्रत्येकी शंभर खाटांची आहेत. यावेळी खा. संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ, माजी आ. दिनकर पाटील, नितीन शिंदे, नीता केळकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विक्रमसिंह कदम आदी उपस्थित होते.

खाडे म्हणाले, ही दोन्ही रुग्णालये सुसज्ज आणि अत्याधुनिक करण्यात येणार आहेत. यामुळे रुग्णांना दिलासा मिळणार आहे. शासकीय रुग्णालयावरील ताण कमी होणार आहे. रुग्णालयासाठी साडेबारा कोटीचा निधी औषधासाठी देण्यात आला असून यापुढेही आवश्यक तो निधी देण्यात येणार आहे.

डॉ. विक्रमसिंह कदम यांनी स्वागत केले. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, खा. संजय पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी श्रीकांत शिंदे, अतिरिक्त अधिष्ठाता डॉ. आहिरे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास देवकारे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

मिरजेत लवकरच मल्टिस्पेशल हॉस्पिटल

मिरजेत लवकरच मल्टिस्पेशल हॉस्पिटलची उभारणी करण्यात येत आहे. सांगलीतील या दोन्ही रुग्णालयांसाठी 82 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामध्ये जिल्हा रुग्णालयासाठी 46, तर माता-बाल संगोपन रुग्णालयासाठी 36 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती पालकमंत्री खाडे यांनी दिली.

Back to top button