२०२४ चा एकच छंद… गोपीचंद : राजेंद्रअण्णा देशमुख | पुढारी

२०२४ चा एकच छंद... गोपीचंद : राजेंद्रअण्णा देशमुख

आटपाडी; पुढारी वृत्तसेवा :  खानापूर मतदारसंघाचा 2024 चा विधानसभेचा एकच छंद गोपीचंद एवढेच लक्षात ठेवून दसर्‍यानंतर कामाला लागायचे आहे, अशा शब्दांत माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख आणि भाजप नेत्यांनी आमदार गोपीचंद पडळकर यांना शुभेच्छा दिल्या.

भाजप नेते आणि विधानपरिषदेचे सदस्य आमदार पडळकर यांचा वाढदिवस रविवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संपूर्ण खानापूर मतदारसंघामध्ये यानिमित्त विविध उपक्रम पार पडले. यामध्ये सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला, तो रविवारी रात्री उशिरा आटपाडीच्या देशमुख वाड्यात झालेला पडळकर यांचा सत्कार. रात्री साडेदहानंतर झालेल्या या जाहीर कार्यक्रमात माजी आमदार देशमुख यांनी भाषण केले. खानापूर मतदारसंघाचा 2024 चा विधानसभेचा एकच छंद, अशी घोषणा त्यांनी दिली. त्यावर उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांनी गोपीचंद !!!! अशी गर्जना केली.

एवढेच बोलून न थांबता माजी आमदार देशमुख यांनी, आपण एवढेच लक्षात ठेवून दसर्‍यानंतर पूर्ण तालुक्यामध्ये आणि मतदारसंघामध्ये कामाला लागायचे आहे, असे आवाहन केले. त्यामुळे आटपाडीच्या देशमुख वाड्याच्या एकूणच भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. कारण माजी आमदार देशमुख यांचे धाकटे बंधू अमरसिंह देशमुख भाजपचे मतदार संघाचे अध्यक्ष आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांच्याबरोबर विविध कार्यक्रमांत एकत्र दिसत आहेत. आगामी 2024 च्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या महायुतीकडून आमदार बाबर यांची दावेदारी प्रबळ आहे.

असे असताना आटपाडीच्या मातब्बर भाजप नेत्याने आमदार पडळकर यांची उमेदवारीच एकप्रकारे जाहीर केली आहे. त्यामुळे महायुतीअंतर्गत नेमके काय चालले आहे, असा प्रश्न सामान्यांना पडला असतानाच, ही महायुतीतील धुसफूस आहे का? आगामी बदलत्या काही राजकारणाच्या वेगळ्या समीकरणाची नांदी तर नव्हे ना ? याची चर्चा संपूर्ण खानापूर मतदार संघात रंगली आहे.

Back to top button