सांगली : आटपाडीत जिल्हा बँक ठरावावरून दोन गटात घमासान | पुढारी

सांगली : आटपाडीत जिल्हा बँक ठरावावरून दोन गटात घमासान

आटपाडी : पुढारी वृत्तसेवा

आटपाडी (जि. सांगली) येथील अण्णाभाऊ साठे चौकात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीने राष्ट्रवादीचे राजू जानकर तर माजी समाजकल्याण सभापती ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीने शिवसेनेचे बाळू मेटकरी यांना उडविले.या घटनेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव राजू जानकर आणि बाळू मेटकरी गंभीर जखमी झाले.दुपारी ४.३० च्या सुमारास ही घटना घडली.जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी ठरावाच्या कारणावरून ही घटना घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी निवडणूक लागली आहे.भाजपकडून माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख आणि शिवसेनेचे तानाजी पाटील यांनी अर्ज भरले आहेत.या दोघांमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. मानेवाडी सोसायटी मार्फत सर्वानुमते दादासाहेब बरकडे यांना मतदानाचा अधिकार देण्याचा ठराव झाला आहे.भाजप गटाकडे कल असलेल्या बरकडे यांनी शिवसेनेच्या तानाजी पाटील यांना समर्थन दिले आहे. या मुद्यावरून भाजपच्या समर्थकांची बरकडे यांच्या नातलगांशी बाचाबाची झाली.पुन्हा या विषयावरून दुपारी पडळकर व राष्ट्रवादीचे राजू जानकर यांच्यात फोनवरून वादावादी झाली.

दरम्यान मतदार पळवापळवीच्या शक्यतेने सेना व राष्ट्रवादीचे समर्थक साठेनगर चौकात जमले होते.सपोनि सुधीर पाटील देखील यावेळी उपस्थित होते.निंबवडे रस्त्यावरून आमदार पडळकर हे चालक गणेश भुते सोबत एका गाडीत आणि ब्रम्हानंद पडळकर दुसऱ्या गाडीत होते.साठे चौकात या गाड्यांवर सेना आणि राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी दगडफेक केली.

यावेळी ब्रम्हानंद पडळकर यांच्या गाडीने बाळू मोटे यांना उडवले.तर आमदार पडळकर यांची गाडी दिघंचीच्या दिशेने गेली आणि माघारी परततांना त्यांच्या गाडीने मोटारसायकलला ठोकर देत राजू जानकर यांना ठोकरले.या घटनेत सुदैवाने सपोनि पाटील थोडक्यात बचावले.परंतु राजू जानकर यांचा पाय मोडला तर बाळू मोटे गंभीर जखमी झाले आहेत.

या घटनेमुळे आटपाडी शहरात तणावपूर्ण वातावरण आहे. पोलिसांच्या उपस्थितीत साठे चौकात काठ्या घेऊन सुमारे २०० कार्यकर्ते आणि साई मंदिर चौकात पडळकर समर्थक सुमारे २०० कार्यकर्ते जमले होते.सायंकाळी ७ च्या सुमारास पोलिसांनी दोन्ही गटांना पांगवल्याने थोडा तणाव कमी झाला.परंतु या घटनेचे पुन्हा पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत.

Back to top button