

अबुधाबी; पुढारी ऑनलाईन : NZ vs AFG : अबुधाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील सुपर-१२ सामन्यादरम्यान एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पाकिस्तानी वाहिनी एआरवाय न्यूजनुसार, खेळपट्टी बनवणारे क्युरेटर मोहन सिंग यांचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत सापडला आहे. मृत्यूचे कारण अद्याप समोर आलेले नाही, मात्र मीडिया रिपोर्ट्समध्ये ही आत्महत्या असल्याचे सांगण्यात येत आहे. यामागची कारणे शोधण्यासाठी पोलिस प्रशासनाने तपास सुरू केला आहे. टीम इंडियासाठी हा सामना खूप महत्त्वाचा होता. जर अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पराभव केला असता तर टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहचू शकणार होती. पण तसं झालं नाही आणि किवी संघाने अफगाण संघाचा ८ विकेट्स राखून पराभव केला. याच बरोबर न्यूझीलंडने उपांत्य फेरी गाठली.
दरम्यान , या सामन्यासाठी खेळपट्टी बनवणारे मोहन सिंग यांचा आज मृत्यू झाल्याचे समोर आहे आहे. त्यांच्या मृत्यूबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. ३६ वर्षीय मोहन सिंग हे भारताचे रहिवासी आहेत. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजचे संघ शेख झायेद स्टेडियमच्या विकेटवर खेळले आहेत आणि सर्व विकेट मोहन सिंग यांनी तयार केल्या आहेत. मोहाली येथील पंजाब क्रिकेट स्टेडियममध्ये क्युरेटर म्हणून त्यांनी प्रशिक्षण घेतले होते.
१७ मार्च २००७ रोजी पाकिस्तान आणि आयर्लंड यांच्यात विश्वचषक सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान संघाचा दारुण पराभव झाला. यासोबतच ते स्पर्धेतूनही बाहेर पडले होते. दुसऱ्याच दिवशी पाक संघाचे प्रशिक्षक बॉब वूल्मर यांचा मृतदेह सापडला. जमैकाच्या किंग्स्टन येथील हॉटेलच्या खोलीच्या बाथरूममध्ये त्याचा मृतदेह सापडला. त्याच्या अंगावर एकही कपडा नव्हता.