

पुणे, पुढारी वृत्तसेवा : Liquor Seized : केवळ गोव्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याची औषधाच्या नावाखाली बेकादेशीर वाहतूक करणारा ट्रक उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करून जप्त केला. या कारवाईत वाहनासह तब्बल 52 लाख 42 हजारांचा मद्यसाठा जप्त करून एकाला अटक करण्यात आली.
कृष्णा तुळशीराम कांदे (30, रा. अंबील वडगाव, पोस्ट, पोथरा, ता. बीड, जि. बीड) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. त्याच्यावर मुंबई दारू बंदी कायद्याच्या विविध कलमांनुसार तसेच फसवणूक, बनावट पद्धतीने विक्री करत असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी (दि.6) वारजे माळवाडी परिसरात सहा चाकी ट्रक केवळ गोव्यासाठी मद्याची विक्री करण्यास परवानगी असलेल्या मद्याची वाहतूक करत असल्याची माहिती उत्पादन शुल्क विभागाला (डी विभाग) मिळाली. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क आयुक्त कांतीला उमाप, विभागीय उपायुक्त प्रसाद सुर्वे, राज्य उत्पादन शुल्क पुणेेचे अधीक्षक संतोष झगडे व बीडचे उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन घुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय डेरे, दुय्यम निरीक्षक गणेश केंद्रे, योगेंद्र लोळे, सागर धुर्वे, तसेच समीर पडवळ, महेश बनसोडे, राजू पोटे, अभिजित सीसोलेकर यांनी छापा टाकून सहाचाकी ट्रक जप्त केला. ट्रकमध्ये 10 लाख 44 हजाराच्या इंपिरिअर ब्ल्यू विस्कीच्या 145 बॉक्स मध्ये 6 हजार 960 बाटल्या, मॅकडॉलचे 19 लाख 58 हजार 400 रुपयांचे 255 बॉक्समध्ये 12 हजार 240 बाटल्या, एड्रीयल क्लासीक व्हिस्कीच्या 2 लाख 40 हजारांच्या 600 बाटल्या असा एकूण 52 लाख 42 हजार 400 रुपयांचा मद्यसाठा ट्रकसह जप्त करण्यात आला. याप्रकरणी उत्पादन शुल्कने गुन्हा दाखल केला आहे.
पकडण्यात आलेला ट्रक हा बीडला जाणार होता. गाडीमध्ये सीलबंद माल हा औषधे असल्याचे बिल आरोपीकडे होते. गोव्यातील वेरणा ते राजस्थान मधील जोधपूर तसेच बिल त्याच्याकडे होते. पाठीमागे ट्रकला सील होते. औषधे असल्या कारणाने ते सील कोणी तोडण्यास धजावत नाही. परंतु, आम्हाला मिळालेली माहिती खात्री लायक असल्याने आम्ही संबंधित ट्रकवर छापा टाकला. यावेळी आम्हाला मोठ्या प्रमाणावर मद्य साठा सापडला.
– संतोष झगडे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, पुणे
दारूने भरलेल्या ट्रकची वाहतूक करण्यासाठी ट्रकमध्ये औषधे असल्याचे भासविण्यासाठी त्या पद्धतीचेच बिल बनविण्यात आले होते. ते बिल चेकपोस्टवर दाखविण्यात येत होते. तसेच सीलबंद गाडीही कोणी उघडून पाहत नसल्याचेही मद्याची तस्करी करणार्याला माहिती होते. परंतु ह्या गुन्हा करण्याच्या पद्धतीची माहिती उत्पादनशुल्क विभागाला मिळाली. गाडी गोव्यावरून पुण्यातून बीड येथे जाणार असल्याने गाडीला पुण्यातील वारजे परिसरात अडविण्यात आली.
बीडमधील ज्या ढाब्यांना अधिकृत मद्यविक्रीचा परवाना आहे अशा ढाब्यावर ते मद्याचे बॉक्स उतरविले जात होते. तर काही बाटल्या पुन्हा भरून महाराष्ट्रातील विक्री योग्य मद्य म्हणून त्याची पुर्नविक्री केली जात असल्याचे समोर आल्याचे झगडे यांनी सांगितले.