सांगली जिल्ह्यात ‘आयटी पार्क’ची उभारणी शक्य | पुढारी

सांगली जिल्ह्यात ‘आयटी पार्क’ची उभारणी शक्य

सांगली, संजय खंबाळे : भारतासह जगभरात माहिती तंत्रज्ञान(आयटी) क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. पुण्यासारख्या शहरात आयटी ओव्हर फ्लो होत आहे. त्यामुळे अनेक आयटी कंपन्या आपल्या विस्तार करण्यासाठी इतर शहरात चाचपणी करीत आहेत. जिल्ह्यात सध्या आयटी पार्कसाठी पोषक वातावरण आहे. याचा फ ायदा घेऊन सांगलीत आयटीची पेरणी करण्यासाठी लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, नागरिक अशा सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

पुणे, बंगळूर, हैद्राबाद अशा मोठ्या शहरात आयटीचा विस्तार झपाट्याने झाला. आज या क्षेत्रात हजारों युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भूमिपुत्रांना या संधी जिल्ह्यात उपलब्ध होणे शक्य आहे.

जिल्ह्यात आयटी, कॉम्प्युटर यासह इतर संगणक शाखेतून शिक्षण पूर्ण करून शेकडो तरुण नोकरीच्या शोधासाठी पुणे, मुंबईची वाट धरत आहेत. इच्छा नसूनही अनेकांना गावापासून दूर जावे लागते. त्याठिकाणी राहण्याची, जेवणाची आणि इतर दैनंदिन गरजा पूर्ण करताना तरुणांची कसरत होते. अनेकजण नाईलाजाने नोकरी करीत आहेत. आपल्या जिल्ह्यात ‘आयटी हब’ व्हावे अशी अनेकांची इच्छा आहे. मात्र, त्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

पायाभूत सुविधा उपलब्ध

गेल्या दहा-पंधरा वर्षांत सर्वच गोष्टीत जिल्ह्यात मोठा बदल झाला आहे. दळण-वळणासाठी चांगले रस्ते झाले आहेत. अनेक महामार्गाचे जाळे झाले. राहण्यासाठी सर्व सोयीयुक्त रुम्स, लॉज उपलब्ध आहेत. विविध पदार्थांची चव चाखण्यासाठी हॉटेल्स् उभी झाली आहेत. राज्यातील इतर जिल्ह्याच्या तुरलेन हवेतील प्रदूषण कमी आहे. सांगलीपासून 50 किलोमीटरच्या अंतरावर विमानसेवा उपलब्ध आहे. कवलापूरमध्ये विमानतळ होण्यासाठी तांत्रिक मान्यता मिळाली आहे. इंटरनेट हा आयटी कंपनीचा अविभाज्य घटक आहे. वीज ही या क्षेत्राचा आत्माच आहे. या दोन्ही गोष्टी जिल्ह्यात पुरेशा उपलब्ध आहेत. कंपन्या उभारण्यासाठी जागाही उपलब्ध आहेत. तसेच कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटक राज्य जिल्ह्यापासून जवळ आहे. त्यामुळे मनुष्यबळ मिळण्यास अडचण नाही. आयटी कंपनी उभारणीसाठी बहुसंख्य पायाभूत सुविधा सध्या जिल्ह्यात आहेत. त्यामुळे सांगली, मिरजेसह जिल्ह्याच्या विकासाला भरारी देण्यासाठी, तरुणांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी आयटी कंपन्यांची उभारणी होणे गरजेचे आहे आणि ते शक्यही आहे. अर्थात त्यासाठी राजकीय आणि स्थानिक लोकांचे पाठबळ गरजेचे आहे.

जगातील अनेक टॉप कंपन्या भारतात आहेत. महाराष्ट्र राज्य या क्षेत्रात आघाडीवर आहे. अनेक आयटी कंपन्या आपला विस्तार करण्यासाठी सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात चाचपणी करीत आहेत. नाट्यपंढरी म्हणून ओळख असलेल्या जिल्ह्याची आयटी हब म्हणून ओळख होण्यासाठी सर्वांनीच पाठपुरावा करण्याची मागणी होत आहे.

आयटी पार्कसाठी जमेच्या बाजू

हायस्पीड इंटरनेट सेवा उपलब्ध
विजेचा 24 तास अखंड पुरवठा
पन्नास किलोमीटर अंतरावर विमानसेवा उपलब्ध
कर्मचार्‍यांना राहण्याची, खाण्याची उत्तम व्यवस्था
दळण-वळणासाठी चांगले रस्ते
सुशिक्षितांची फ ौज काही ठिकाणी जागा उपलब्ध
प्रदूषण कमी ः शुद्ध हवा सुरक्षतेबाबत सेफ जागा
वाहतुकीची सुरळीत व्यवस्था

सांगलीत पतंगराव कदम यांनी केला होता प्रयोग

माजी मंत्री डॉ. पंतगराव कदम यांनी सुमारे 15 वर्षांपूर्वी सांगलीत विलिंग्डन महाविद्यालयाच्या मागे असणार्‍या जागेत आयटी कंपनीसाठी स्ट्रक्चरची उभारणी केली होती. कंपनीच्या व्यवस्थापनाला लागणार्‍या सोयी-सुविधा उपलब्ध केल्या करुन दिल्या होत्या. मात्र, त्यावेळी कंपन्यांनी हिरवा कंदिल दिला नाही. मात्र, सध्या आयटीसाठी पोषक वातावरण आहे.

पालकमंत्र्यांकडून प्रयत्न : सर्वांचे पाठबळ हवे

पालकमंत्री सुरेश खाडे हे आयटी कंपन्या जिल्ह्यात येण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी काही कंपन्यांच्या व्यवस्थापनाशी भेट घेऊन सांगलीत विस्तार करण्यासाठी मागणी केली आहे. त्यांच्या मागणीला अनेक कंपन्यांनी प्रतिसाद दिला आहे. त्यांचा प्रयत्न यशस्वी होण्यासाठी सर्वांनीच पुढाकार घेण्याची गरज आहे.

सांगली, मिरजेत पंधरा छोट्या आयटी कंपन्या

जिल्ह्याने शिक्षण क्षेत्रात प्रगती केली आहे. सुशिक्षितेचे प्रमाण वाढले आहे. हजारो युवक-युवतींनी संगणक शाखेसह विविध शाखेतून शिक्षण पूर्ण केले आहे. यातील काहीजणांनी सांगली, मिरजेत छोट्या आयटी कंपन्या सुरू केल्या आहेत. त्याठिकाणी दहा लोकांपासून ते पन्नास लोकापर्यंत कर्मचारी काम करीत आहेत.

Back to top button