डोकं ठेचलेला, गुप्तांग छाटलेला मृतदेह; पण तासगाव पोलिसांनी उलगडलं खुनाचे रहस्य | पुढारी

डोकं ठेचलेला, गुप्तांग छाटलेला मृतदेह; पण तासगाव पोलिसांनी उलगडलं खुनाचे रहस्य

तासगाव; प्रमोद चव्हाण : तासगाव पोलिसांना डोकं ठेचलेला, गुप्तांग छाटलेला मृतदेह विहिरीत आढळून आला होता. तासगाव पोलिसांना मृतदेहाची ओळख पटेल असा कोणताच सुगावा मिळत नव्हता. पण पोलिसांनी ७ जिल्ह्यांत ४ दिवसांत तपास करुन गुन्हेगाराला जेरबंद केले.

सांगलीत तासगाव-निमणी रस्त्याच्या बाजूला सुभाष लुगडे यांचं शेत आहे. शेतात त्यांनी नुकतीच विहीर खोदली होती. विहिरीला चांगलं पाणी लागल्याने ते आनंदात होते. पण १० जूनला सकाळी ते शेतात आले असता भलताच प्रकार घडला.

तासगाव जवळील नव्याने खोदलेल्या विहिरीत एक मृतदेह तरंगत असल्याचे त्यांना दिसले. प्लास्टिकच्या कागदात आणि पोत्यात गुंडाळलेल्या अवस्थेत हा मृतदेह होता. विहिरीत मृतदेह पाहून लुगडे यांना धक्का बसला होता.

अधिक वाचा :

त्यांनी तातडीने तासगाव पोलिसांत संपर्क साधला आणि घडला प्रकार कळवला. पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांना ही माहिती कळवण्यात आली. मिळालेल्या माहितीवरून हा प्रकार खुनाचा आहे, हे झाडे यांच्या कुशाग्र बुद्धीने चटकन हेरले होते. सहकाऱ्यांसह त्यांनी लुगडे यांच्या शेतात धाव घेतली.

प्रेत बाहेर काढले असता ते पुरुषाचे असल्याचे लक्षात आले. पोस्टमार्टेममधून डोक्यात वार करून खून झाल्याचे निष्पन्न झाले. आणखी एक विचित्र प्रकार लक्षात आला तो म्हणजे या प्रेताचे गुप्तांग छाटण्यात आले होते.

अशा प्रकरणात पहिलं काम असतं ते म्हणजे मृतदेहाची ओळख पटवणं. दरम्यान उपनिरीक्षक विठ्ठल शेळके यांनी सरकारच्या वतीने खुनाची फिर्याद तासगाव पोलिस ठाण्यात दिली.

अधिक वाचा :

वर्तमानपत्रं आणि इतर माध्यामांतून माहिती देऊनही मृतदेहाची ओळख पटेल असा कोणताच सुगावा पोलिसांना मिळत नव्हता. अगदी इतर जिल्ह्यांतही याबद्दलची माहिती प्रसारित करण्यात आली होती.

दरम्यान स्थानिक अन्वेषण विभागानेही त्यांचे खबरी कामाला लावले होते. त्यात पोलिसांना एक सुगावा मिळाला. तासगाव नगरपरिषदेचे बांधकामचे काम सुरू असून तेथील काही लोक बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

पोलिसांनी येथील कामगारांची चौकशी केली असता जेसिबीचे मालक हरी पाटील, जेसिबीचा चालक सुनील राठोड आणि सुनीलची पत्नी पार्वती हे बेपत्ता असल्याचे कळाले. सोबत जेसिबीही गायब असल्याचे लक्षात आले.

अधिक वाचा :

पोलिसांनी हरी पाटील यांचे गाव मंगसुळी येथून त्यांचा फोटो मागवून घेतला. त्यातून हा मृतदेह हरी पाटील यांचाच असल्याचे लक्षात आले. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर पुढचे काम सोपे होणार होते.

गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी सुनील राठोड आणि त्याची बायको यांचा शोध सुरू केला. या दोघांचे मूळ गाव विजापूर येथील येलगोडा असल्याचे पोलिसांना समजले होते. पोलिसांनी येलगोडापर्यंत धाव घेतली पण दोघे गावात नव्हते.

फडणीस यांनी एक अंदाज बांधला होता; तो म्हणजे दोघे नवरा बायको जेसिबीसह फरार आहेत. याचा अर्थ ते कुठे तरी कामावर असले पाहिजेत. त्यानंतर त्यांनी जेसिबीची कामे जवळपास कुठे सुरू आहेत, याची माहिती मागवून मोठ्या प्रमाणावर तपास यंत्रणा राबवली. जवळपास १२०० किलोमीटरचा प्रवास करत पोलिस दोन दिवसांत पोलिस पुण्यात पोहोचले होते.

पुण्यात विविध ठिकाणी शोध मोहीम राबवली असता, राठोड नवरा बायको अखेर स्वारगेट परिसरात सापडले. दोघांना तासगाव पोलिस ठाण्यात आणले असता त्यांची चौकशी करण्यात आली.

अधिक वाचा :

सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे देत असलेले राठोड नवरा बायको पोलिस खाक्या दाखवताच पोपटासारखे बोलू लागले. त्यांनी हरी पाटील याचा खून केल्याची कबुली दिली.

नेमकं प्रकरण काय?

हरी पाटील यांनी तासगावात खोदकामाचे कंत्राट घेतले होते. त्यांच्या जेसिबीवर सुनील हा ड्रायव्हर होता. सुनील याला दारूचे व्यसन होते. मिळणारा पगार तो दारूवर उडवत असे. हरीचे सुनीलच्या घरी येजा असायची. त्यातून त्याने सुनीलच्या पत्नीसोबत जबरदस्तीने अनैतिक संबंध प्रस्थापित केले होते.

हा प्रकार सुनीलच्या लक्षात आल्यानंतर त्याचा हरीशी वाद झाला होता. त्यातून ते कामावर जाणे बंद केले. ८ जूनलला सुनील आणि हरी यांच्या वाद झाला, त्यात सुनीलने हरीच्या डोक्यात फावडे घातले. त्यात हरी जागेवरच ठार झाला.

अधिक वाचा :

सुनील त्यानंतर जेसिबीतून हा मृतदेह घरी आणला आणि पार्वतीला घडलेला प्रकार सांगितला. पार्वतीही हरीवर संतापली होतीच. तिने चाकूने हरीच्या मृतदेहाचे गुप्तांग कापले. हा मृतदेह तसाच घरात पडून होता.

त्यानंतर प्लास्टिकचा कागद आणि पोत्यात मृतदेह बांधून तो जेसिबीच्या बकेटमध्ये घातला आणि शेजारच्या विहिरीत नेऊन टाकला. त्यानंतर नवरा-बायको दोन मुलांसह पसार झाले. जाताना त्यांनी जेसिबीही सोबत नेला होता.

पोलिसांचे तपास कौशल्य…

पोलिसांना खुनाचा प्रकार समजला १० जूनला आणि १४ जूनला आरोपी जेरबंद झाले होते. खून झालेल्या व्यक्तीची कसलीच माहिती उपलब्ध नसताना पोलिसांनी दोन राज्यांतील ७ जिल्हे पिंजून काढत गुन्हेगारांना गजाआड केले. याबद्दल पोलिस दलात तपासपथकाचे कौतुक होत आहे.

अधिक वाचा :

तपास पथक असे…

पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, पोलीस निरीक्षक संजीव झाडे, सहा. पोलीस निरीक्षक रविराज फडणीस, सहा. पोलीस निरीक्षक संजय क्षीरसागर, पोलीस उपनिरीक्षक दिलीप ढेरे, पोलीस उपनिरीक्षक अभिजीत सावंत, सुभाष सुर्यवंशी, अच्युत सुर्यवंशी, जितेंद्र जाधव, संदीपदादा गुरव, संदीप नलावडे, चेतन महाराज, आबा धोत्रे, अनिलभाऊ कोळेकर, सागर टिगरे, कुंबेर खोत, आमसिद्धा अण्णा खोत, मच्छिंद्र बर्डे, सतिश अलदर, बजरंग शिरतोडे, मोण्या कार्तियानी, निसार मुंलाणी, संदीप पाटील, प्रकाश पाटील, कॅप्टन गुंडबाडे, महादेव नागणे, शशिकांत जाधव.

हे ही वाचा :

पहा व्हिडिओ : कोल्हापूर : कौटुंबिक वादातून पत्नीसह मेव्हण्याचा अमानुष खून

Back to top button