उत्तर प्रदेशमध्ये साखळी स्फोटांचा कट उधळला! | पुढारी

उत्तर प्रदेशमध्ये साखळी स्फोटांचा कट उधळला!

लखनौ ; वृत्तसंस्था : लखनौमध्ये रविवारी दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) ‘अल-कायदा’च्या तीन दहशतवाद्यांना अटक केली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर स्फोटके जप्‍त केली आहेत. या घटनेनंतर उत्तर प्रदेश मध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हरदोई, सीतापूर, बाराबंकी, उन्‍नाव आणि रायबरेली या जिल्ह्यांसह लखनौ आयुक्‍तालय परिसरात दहशतवादी हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. राज्यभर सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अटकेतील दहशतवादी लखनौसह काही जिल्ह्यांतून बॉम्बस्फोट घडवण्याच्या तयारीत होते.

दोन प्रेशर कुकर बॉम्ब पोलिसांनी जप्‍त केले आहेत. मोठ्या प्रमाणावर स्फोटक सामग्री तसेच विदेशी पिस्तुलेही जप्‍त करण्यात आली आहेत.

‘एटीएस’ने लखनौतील ज्या घरावर छापा टाकला, त्यात एकूण 7 जण होते. दोन ‘एटीएस’च्या हाती लागले, तर 5 जण पळून जाण्यात यशस्वी ठरले. मात्र, त्यातील एकाला मलिहाबाद येथून अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. शाहिद खान गुड्डू आणि वसीम अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

जम्मू बॉम्बस्फोटाशी संबंध

काही दिवसांपूर्वी जम्मूत झालल्या स्फोटांच्या तपासादरम्यान लखनौत लपून असलेल्या या दहशतवाद्यांची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती.

पाकिस्तानच्या संपर्कात

शाहिद हा 5 वर्षांपासून सौदी अरेबियात वास्तव्यास आहे. तो ‘टेलिग्राम’च्या माध्यमातून ‘अल-कायदा’ व पाकिस्तानी हस्तकाच्या संपर्कात होता. अटकेपूर्वी त्याने स्वत:जवळील काही कागदपत्रे जाळून टाकल्याची माहिती समोर आली आहे.

दहशतवाद्यांचे हे 2 इरादे

लखनौसह उत्तर प्रदेशातील विविध शहरांतून एकाचवेळी बॉम्बस्फोट घडविणे.
राज्यातील प्रसिद्धी वलय असलेल्या नेत्यांच्या व कार्यकर्त्यांच्या हत्या करणे.

राज्यभर हायअलर्ट;

बॉम्ब, पिस्तुले, स्फोटके जप्‍त
‘अल-कायदा’च्या 3 दहशतवाद्यांना अटक
लखनौ, मलिहाबादेत ‘एटीएस’ची कारवाई
चार दहशतवादी निसटल्याने हल्ल्यांचा धोका

Back to top button