शिर्डी : राजेंद्र धिवर यांची सुपारी देऊन हत्या | पुढारी

शिर्डी : राजेंद्र धिवर यांची सुपारी देऊन हत्या

शिर्डी ; पुढारी वृत्तसेवा : शिर्डी हद्दीत मागील पंधरवाड्यात झालेल्या आव्हानात्मक खुनाचा तपास अखेर पोलिसांना यश आले असून, बांधकाम मजूर राजेंद्र धिवर खून प्रकरणातील मुख्य सूत्रधारासह चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

राजेंद्र धिवर यांचा चार लाख रुपयांची सुपारी देऊन खून करण्यात आला असल्याची माहिती पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी शिर्डी येथे पत्रकार परिषदेत दिली.

याप्रसंगी अतिरिक्त पोलिस अधीक्षिका डॉ. दीपाली काळे, उपविभागीय पोलिस अधीक्षक संजय सातव, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके, शिर्डी पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रवीण लोखंडे, कोपरगाव तालुका पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दौलतराव जाधव आदींसह पोलिस अधिकारी उपस्थित होते.

शिर्डी तील नगर-मनमाड रस्त्यावरील हॉटेल पॅलेसिएस व हॉटेल निसर्ग यांच्या विरुद्ध बाजूस मोकळ्या जागेत आगपेटी मागण्याच्या तत्कालीन बहाण्याने राजेंद्र धिवर यांचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला होता. याबाबत संजय पवार यांनी तशी तक्रार पोलिस ठाण्यात दिली होती. मात्र, या खून प्रकरणात कुठलाही सुगावा लागणे तसे आव्हानात्मक होते.

यासाठी पोलिसांनी सुमारे 40 ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज पडताळले होते. यातून ते आरोपी दुचाकीवरून नाशिककडे गेल्याचे निदर्शनास आले. तसेच, आरोपींनी गुन्ह्यात वापरलेल्या दुचाकीचा क्रमांक शोधण्यासाठी नाशिक गुन्हे शाखेची मदत झाली.

यामध्ये राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे (वय 19) व अविनाश प्रल्हाद सावंत (वय 19, दोघेही रा. नाशिक) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर अमोल लोंढे (रा. शिर्डी) यांच्या सांगण्यावरून हसीम खान (रा. नालासोपारा, ठाणे) कुलदीप पंडित, गॅस उर्फ साहिल शेख, साहिल पठाण (सर्व रा. नाशिक) यांनी हा खून केला.

युरो कप : इंग्लंड – इटली भिडणार

नाशिक येथील आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल लोंढे (वय 32, रा. कालिकानगर, शिर्डी) याला अटक करण्यात आली. मयत धिवर व लोंढे यांच्यात गेल्या दहा वर्षार्ंपासून कौटुंबीक वाद होता. याबाबत धिवर यांच्याविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात लोंढे याने तक्रारही दाखल केली होती. मात्र, धिवर नेहमी त्रास देत होते.

त्यामुळे शिर्डीतील अरविंद महादेव सोनवणे (रा. शिर्डी) यांच्या मदतीने लोंढे याने आरोपींना धिवर यांचा काटा काढण्यासाठी चार लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यावरून हा हत्याकांडाचा प्रकार घडला होता. या प्रकरणातील आरोपी राजू उर्फ चंद्रहास सुभाष उबाळे, अविनाश प्रल्हाद सावंत यांच्यावर नाशिक येथील इंदिरानगर पोलिस ठाण्यात खुनाचे गुन्हे दाखल आहेत.

हा तपास लावण्यासाठी वैज्ञानिक तपासाच्या आधारे चार आरोपींच्या मुसक्या आवळण्यात यश आले आहे. यातील काही आरोपी अद्याप पसार असून, त्यांचा शोध सुरू आहे. अटक केलेल्या आरोपींना लवकरच राहाता न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. 10 दिवसांत या गुन्ह्याची उकल झाली आहे.

 

 

Back to top button