गृहकर्ज जोडा बचत खात्याशी

गृहकर्ज जोडा बचत खात्याशी
Published on
Updated on

गृहकर्जाचे हप्ते हे जवळपास सर्वांसाठीच एक मोठी जबाबदारी असते. आर्थिक उत्पन्न कमी झालेल्या काळात हे हप्ते ताण वाढवणारे ठरतात. मात्र एका उपायाद्वारे आपला गृहकर्जासारखा हप्ता कमी करता येणे शक्य झाले आहे. त्याकरिता आपले गृहकर्ज खाते तुम्हाला बचतखात्याशी लिंक करावे लागेल. असे केल्याने आपला गृहकर्जावरचा हप्ता तर कमी होईलच, शिवाय गृहकर्जाचा कालावधीही कमी होऊ शकणार आहे.

गृहकर्जाचे खाते बचत खात्याशी लिंक करण्याची सुविधा स्टेट बँक, आयसीआयसीआय, बडोदा बँक, आयडीबीआय यासारख्या अनेक बँकांनी ग्राहकांना दिलेली आहे. यासाठी ग्राहकांना एक प्रक्रिया पूर्ण करावी लागते. गृहकर्ज काढताना त्या ग्राहकाला त्याच बँकेत आपले बचत खाते उघडावे लागते. असे केल्यानंतर त्या ग्राहकाचे बचत खाते त्याच्या गृहकर्जाशी जोडले जाते.

असे केल्याने ग्राहकाच्या बचत खात्यात जेवढी रक्कम जमा होत असेल, ती त्या खात्याची मूळ रक्कम मानली जाते. समजा, तुम्ही 20 लाखांचे गृहकर्ज घेतले आहे आणि तुमच्या बचत खात्यात 1 लाख रुपये जमा आहेत. अशा स्थितीत गृहकर्ज बचत खात्याशी लिंक झाल्यामुळे आपल्याला फक्त 19 लाखांवर व्याज द्यावे लागते. यामुळे आपल्या गृहकर्जाच्या हप्त्यात घट होते. त्याचबरोबर आपला कर्जाचा परतफेडीचा कालावधीही कमी होतो.

तुम्ही गृहकर्जाशी बचत खाते जोडले तरी, त्यातून तुम्हाला पैसे काढण्याचे आणि भरण्याचे व्यवहार चालू ठेवता येतात. बचत खात्यावरील रकमेवरील व्याज हे दररोजच्या दररोज काढले जाते. त्यानुसार प्रत्येक दिवशी तुमच्या बचत खात्यात जेवढी रक्कम शिल्लक असेल, त्या रकमेच्या आधारावर तुमच्या गृहकर्जावरील व्याजाचा हिशोब केला जाईल.

वरवर पाहता ही योजना ग्राहकांना अत्यंत आकर्षक वाटू शकते. या योजनेचा लाभ घेण्यापूर्वी ग्राहकांनी काही गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. काही वेळा अशा गृहकर्ज योजनांमध्ये व्याजाचे दर सामान्य गृहकर्जापेक्षा थोडे अधिक असतात. व्याजदर अधिक असले तरी या योजनेद्वारे ग्राहकांची मोठी बचत होण्याची शक्यता असते.

बचत अथवा चालू खात्यात शिल्लक असलेल्या रकमेवर नगण्य व्याज मिळते. या योजनेत तुमच्या बचत खात्यात शिल्लक असलेल्या रकमेचा वापर आपले गृहकर्जावरचे व्याज कमी करण्या करिता केला जातो. तुम्हाला गरज लागली तर तुम्ही बचत खात्यातून केव्हाही, कितीही पैसे काढू शकता. पैसे काढल्यानंतर राहिलेल्या शिलकी रकमेच्या आधारे गृहकर्जावरचे व्याज काढले जाते.

कीर्ती कदम

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news