चीन बनवतोय ‘अद्वितीय मानव’ | पुढारी

चीन बनवतोय ‘अद्वितीय मानव’

बीजिंग; वॉशिंग्टन : चीन जगावर वर्चस्व कायम करण्यासाठी भयावह प्रयोगांमध्ये मग्न असतो, मग मानवता भग्न झाली तरी या देशाला त्याची पर्वा नसते.

कोरोनाच्या माध्यमातून जगासाठी कर्दनकाळ बनलेला चीन आता ‘अद्वितीय मानवनिर्मिती प्रकल्पा’वर (सुपर ह्युमन प्रोजेक्ट) काम करत आहे.

चीन याने त्यासाठी जगभरातून 52 देशांतील 80 लाख गर्भवती महिलांचा जेनेटिक डेटा लपून-छपून उपलब्ध करून घेतलेला आहे. या डेटावर चीनचे संशोधन सुरू आहे. चीनच्या लष्कराने (पीएलए) या कामात ‘बीजीआय’ या चिनी कंपनीचे सहकार्य घेतलेले आहे. ही कंपनी जगभरातील गर्भवती महिलांच्या प्रसूतीपूर्व व उत्तर तपासणीशी संबंधित आहे. तपासणीच्या नावाखाली या कंपनीने जगभरातून गर्भवती महिलांची जनुके व डेटा गोळा केलेला आहे.

या डेटाला निफ्टी (नॉन इन्व्हेसिव्ह फॅटल ट्रिझोमी) डेटा म्हणून ओळखले जाते. यात महिलेचे वय, वजन, उंची, जन्मस्थळ आदी माहिती असते. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’च्या माध्यमातून चीन अशा तत्त्वांचा शोध घेत आहे, ज्यांतून भविष्यात जन्माला येणार्‍या लोकसंख्येच्या शारीरिक गुणांमध्ये बदल घडवून आणता येतील.

बायडेन यांना मार्चमध्येच सूचना

अमेरिकेतील जो बायडेन प्रशासनातील सल्लागारांनी मार्चमध्येच चीनच्या या प्रकल्पाबाबत इशारा दिला होता. चीनचा हा प्रयोग यशस्वी झाल्यास जगभरातील औषध कंपन्या चीनचा रस्ता धरतील. नंतर चीन या कंपन्यांवर वरचष्मा स्थापन करून नवे षड्यंत्र रचू शकेल.

अनुवांशिक द़ृष्टीने ‘महाबली’ असलेले सैनिक चीन आपल्या लष्करासाठी तयार करेल. या तंत्राच्या सहाय्याने चीन घातक रोगाचे जीवाणू, विषाणू तयार करेल.

भारतासाठीही घातक

डीएनए डेटाच्या आधारे बीजीआय कंपनीसह चिनी सैनिकांच्या जनुकांत बदल करून त्यांना गंभीर आजारांपासून सुरक्षित करण्याचे तंत्र चीन विकसित करत आहे. भारतीय सीमांवर समुद्रसपाटीपासून कमालीच्या उंच ठिकाणी सध्या चिनी सैनिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवतात. या तंत्राच्या मदतीने त्यापासून चिनी सैनिकांची सुटका होईल आणि ते भारताविरुद्ध या भागात ताकदीने लढू शकतील, असाही चीनचा डाव आहे.

Back to top button