

दक्षिण आफ्रिकेने वेस्ट इंडीजचा ( RSA vs WI ) ८ गडी राखून पराभव करत आपले विजयाचे खाते उघडले. आफ्रिकेने पहिल्यांदा गोलंदाजी करत विंडीजला १४३ धावात रोखले. त्यांनतर हे आव्हान दोन गड्यांच्या मोबदल्यात १८.२ षटकात पार केले. आफ्रिकेकडून मार्कक्रमने आक्रमक ( ५१ ) अर्धशतक ठोकले. गोलंदाजीत प्रेटोरियसने भेदक मारा करत १७ धावात ३ बळी टिपले.
वेस्ट इंडीजने ठेवलेल्या १४४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची ( RSA vs WI ) सुरुवात खराब झाली. कर्णधार टेंबा बामुवा अवघ्या ४ धावांची भर घालून माघारी गेला. त्यानंतर रिझा हेंड्रिक आणि रासी व्हॅन डेर डुसेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ५७ धावांची भागीदारी रचत संघाला १० व्या षटकातपर्यंत ६० धावा पार करुन दिल्या.
मात्र अकैल हुसैनने हेंड्रिंग्जला ३९ धावांवर बाद करत ही जोडी फोडली. हेंड्रिग्ज बाद झाल्यानंतर आलेल्या एडिन मार्कक्रमने डुसेन बरोबर दक्षिण आफ्रिकेचा डाव पुढे नेला. मार्कक्रमने आक्रमक फलंदाजी करत २६ चेंडूत दमदार अर्धशतक ठोकले. तर डुसेनने सावध फलंदाजी करत ५१ चेंडूत ४३ धावांची खेळी केली. या जोडीने तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या ८३ धावांचा नाबाद भागीदारीच्या जोरावर दक्षि आफ्रिकेने वेस्ट इंडीजचे १४४ धावांचे आव्हान १८.२ षटकात २ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज ( RSA vs WI ) यांच्यातील सामन्यात दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र आफ्रिकेचा हा निर्णय वेस्ट इंडीजची सलामी जोडी लिंडल सिमोन्स आणि एल्विस लुईसने खोटा ठरला. या दोघांनी पॉवर प्लेमध्ये धडाकेबाज फलंदाजी करत १० षटकात ७३ धावांची सलामी दिली. यात लुईसने ३५ चेंडूत ५३ धावा ठोकून मोठा वाटा उचलला.
मात्र पुढच्या १० षटकात दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करत विंडीजचे एका पाठोपाठ एक फलंदाज माघारी धाडण्यास सुरुवात केली. केशव महाराजने लुईस आणि पुरनला बाद करत दोन धक्के दिले. त्यामुळे विंडजची अवस्था बिनबाद ७३ धावांवरून २ बाद ८७ धावा अशी झाली.
महाराज नंतर प्रेटोरियसने भेदक मारा करण्यास सुरवात केली. त्याने ख्रिस गेल ( १२ ), कायरन पोलार्ड ( २६ ) हायडेन वॉल्श ( ० ) अशा तीन विकेट घेत विंडीजच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. त्याला नॉर्खिया आणि रबाडानेही चांगली साथ देत प्रत्येकी एक विकेट घेतली. आफ्रिकेच्या गोलंदाजांनी केलेल्या या सामुहिक कामगिरीमुळे विंडीजचा डाव २० षटकात ८ बाद १४३ धावांवर आटोपला.