देशात हुकूमशाहीचा अतिरेक तर लोकशाही धोक्यात : महेंद्र लाड | पुढारी

देशात हुकूमशाहीचा अतिरेक तर लोकशाही धोक्यात : महेंद्र लाड

पलूस, पुढारी वृत्तसेवा : ज्या पद्धतीने काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर लोकसभा सदस्यपद रद्द करण्याची तत्काळ कारवाई करण्यात आली. देशातील महाघोटाळे उघड करणाऱ्या आणि देशातील जनतेचा आवाज बनलेल्या राहुल गांधींना अशा दडपशाहीने शांत करू शकत नाही. देशातील जनता राहुल गांधीच्या सोबत असून हुकूमशाहीचा अतिरेक व लोकशाही धोक्यात आल्याचे मत सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक महेंद्र आप्पा लाड यांनी व्यक्त केले.

महेंद्र आप्पा लाड हे पलूस येथे राहुल गांधी यांना लोकसभेतून अपात्र ठरवत त्यांची खासदारकी रद्द करण्यात आल्याच्या निषेधार्थ पलूस तालुका काँग्रेसच्या वतीने ‘संकल्प सत्याग्रह’ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी कृष्णाकाठ उदयोग समूहाचे अध्यक्ष जे. के. बापू जाधव, सांगली जिल्हा काँग्रेस सरचिटणीस हेमंत कुरळे, ओबीसी सेल संघटक शाकीर तांबोळी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव विजय पवार प्रमुख उपस्थित होते.

राहुल गांधी यांना मानहानी प्रकरणात सुरत न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतर तसेच लोकसभा सदस्यत्व रद्द केल्याने काँग्रेसकडून देशभरात सरकारविरोधात निदर्शने केली जात आहेत. दरम्यान सांगली जिल्हा काँग्रेस सरचिटणीस हेमंत कुरळे म्हणाले की, देशात हुकूमशाहीचा अतिरिक्त झाला असून लोकशाही धोक्यात सापडली आहे. भ्रष्टाचार, सरकारविरोधात बोलणे गुन्हा झाला आहे. संसदेत राहुल गांधी यांनी माफी न मागितल्याने दबावतंत्राचा वापर करून कारवाई केली आहे. खासदारकी गेली तर, राहुल गांधी यांचा आवाज दाबू शकणार नाही. ज्याप्रमाणे इंदिराजींनी जनता पक्षाचा पराभव केला त्याच पद्धतीने राहुल गांधी भाजपचा पराभव करतील. असेही ते म्हणाले.

काँग्रेस ओबीसी सेल संघटक शाकीर तांबोळी म्हणाले की. भाजप ओबीसी समाजाचा संबंध भ्रष्टाचारांशी जोडून ओबीसी समाजाचा अपमान करत आहे. काँग्रेस पक्षात ओबीसी समाजाचा योग्य सन्मान राखला जातो. सध्या काँग्रेसचे दोन मुख्यमंत्री ओबीसी समाजाचे आहेत. राहुल गांधी देश जोडण्याचा संकल्प घेऊन चार हजार किमीची पदयात्रा करतात. ते एका जात समुदायचा अपमान करणार नाहीत.

प्रस्ताविक काँग्रेस सरचिटणीस बी.डी पाटील यांनी केले तर आभार युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष डॉ. सुशील गोतपागर यांनी मानले. कार्यक्रमास सर्जेराव पवार, डॉ. मीनाक्षी सावंत, पलूस कडेगाव युवक काँग्रेस अध्यक्ष प्रमोद जाधव, पलूस नगरपरिषदेचे गटनेते सुहास पुदाले, वैभव उगळे, गिरीश गोंदिल, विजय आरबूने व काँग्रेस चे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button