मुश्रीफ यांच्या पत्नीचे अश्रू कोणी विसरणार नाही ः खा. कोल्हे | पुढारी

मुश्रीफ यांच्या पत्नीचे अश्रू कोणी विसरणार नाही ः खा. कोल्हे

कागल; पुढारी वृत्तसेवा : हसन मुश्रीफ यांच्या घरावर छापे पडले तेव्हा त्यांच्या पत्नीच्या डोळ्यात आलेले अश्रू कोणीही विसरलेले नाही. अश्रू पुसता येतील, पण काळजावर झालेल्या जखमेचे काय? असा सवाल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला. कागल येथील गैबी चौकामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते.

खा. कोल्हे म्हणाले की, ही कोल्हापूरच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रात 50 सभा का घ्याव्या लागतात? कागलने जातियवादी विचाराला थारा दिला नाही. 80 वर्षांचे नेते शरद पवार पायाला भिंगरी बांधून महाराष्ट्र पिंजून काढत आहेत. दहा वर्षांत मोदी सरकारने अपेक्षाभंग केला.

आमदार सतेज पाटील म्हणाले, कागलची जबाबदारी वाढली आहे. कोल्हापूरच्या जनतेने शाहू महाराजांना विजयी करायचे ठरवले आहे. कंडका पाडला जाणार आहे. संजय मंडलिकांना गेल्या निवडणुकीत मदत केली. ते आता म्हणतात मदत मागितली होती काय? बॉल कसाही येऊ दे फील्डिंग आपली टाईट आहे. मैदान मारल्याशिवाय राहणार नाही. कोल्हापूरच्या स्वाभिमानाची निवडणूक आहे. बगलबच्चे किती बोलू द्या. बगलबच्च्यांची फौज कितीही काही करू दे. कागलच्या जनतेच्या डोक्यात फिट कंडका कुणाचा पाडायचा. गद्दारांना शिक्षा काय असते हे दाखवून देण्याची गरज आहे. लोकसभा निवडणुकीमुळे साखर कारखान्याच्या कामगारांना निदान पगार तर मिळाला. संजय मंडलिक यांनी भविष्यात काय करणार आहे सांगावे. कागल तालुक्यातून गेल्या निवडणुकीत 70000 चे मताधिक्य होते तेच मताधिक्य शाहू महाराजांना द्या. शाहू महाराज म्हणाले मी कधीही नॉट रिचेबल नसेन. यावेळी माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे, सागर कोंडेकर, संभाजीराव भोकरे, शिवानंद माळी, प्रा. सुकुमार कांबळे, शिवाजीराव मगदूम, शिवाजीराव कांबळे यांची भाषणे झाली.

Back to top button